सिंधुदुर्गात उद्यापासून चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मालवण : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जुलै २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून १४ जुलै २०२४ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच १५ जुलै २०२४ ते १७ जुलै रोजी २०२४ या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत, दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे, अशा परिस्थितीत पक्के घर किवा इमारतीत आसरा घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिद्र सुकटे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!