Breaking : कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत ; पेडणेतील बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
कोकण रेल्वे मार्गावर मडुरे ते पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळावर येऊन बंद पडलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या बोगद्यातून पहिली ट्रेन २२.३४ वा. रवाना झाली असून विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना झाल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
पेडणे येथील बोगद्यात पाणी साचल्याने कोकण रेल्वेवरील अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद होती. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांवरील चिखल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र अतिवृष्टीमुळे यात अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने चार मेल-एक्स्प्रेस खोळंबल्या असून त्यांना जवळच्या रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आले होते.
कोकण रेल्वे टीमच्या सततच्या प्रयत्नांमुळे २२.३४ वाजता ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. दरम्यानच्या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशाना सतत माहिती दिली जात होती. तसेच प्रवाशांना अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कॅन्टीन कार्यरत ठेवण्यात आल्या असून प्रवाशांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.