सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या ४१ वा वर्धापन दिन
रक्तदान शिबीर, गुणवंत मुलांचा सत्कार, पिग्मी एजंटांचा मेळावा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४१ वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी १ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.३० वा. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पिग्मी एजंट मेळावा आदी कार्यक्रम या निमित्त आयोजित करण्यात आले आहेत.
बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा, आपुलकीच्या सेवा लाखो ग्राहकांना देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक दिवस स्पर्धेचा असूनही शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना, सवलतीच्या दरात कर्जे, शेती पुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक आज महाराष्ट्रात अव्वलस्थानी आहे. ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४२ वर्षात पदार्पण करत आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे.