जिल्हा परिषदेचा सुद्धा अर्थसंकल्प असतो हे माहित नसणाऱ्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलणे हास्यास्पद
भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड यांची हरी खोबरेकरांवर टीका
मालवण | कुणाल मांजरेकर
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभि लाड यांनी टीका केली आहे. स्वतः जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेचा सुद्धा अर्थसंकल्प असतो हे माहित नसणाऱ्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलणे हास्यास्पद असल्याचा टोला श्री. लाड यांनी लगावला आहे.
याबाबत प्रसिद्धिपत्रकात अभि लाड यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषदेचा सदस्य असताना जि. प. चा सुद्धा अर्थसंकल्प असतो आणि तो कसा बनवतात याचं ज्याला ज्ञान नाही, त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलणे यासारखा दुसरा विनोद नाही. जिल्हा परिषदेत असताना जर लोकांच्या विषयावर आवाज उठवला असता तर किमान अर्थसंकल्प कळतो असं समजता आलं असतं. आताचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, गरीब, कष्टकरी, आणि सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी बनवलेला अर्थसंकल्प अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण ही योजना तर घराघरात महिलांना आधार देणारी योजना आहे. पाणबुडी प्रकल्प आणि स्कुबा ड्रायव्हिंग स्कूल हे प्रकल्प सिंधुदुर्गला उभारी देण्याचं काम करणारे प्रकल्प आहेत. त्यामुळे ज्यांच्या काळात एक एसटी स्टँड बांधता आला नाही, त्यांना अर्थसंकल्पावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही फक्त खोटं बोला रेटून बोला आम्ही काम करुन दाखवू आणि भविष्यातील सगळ्या क्षेत्रात विजय संपादन करत राहू, असे अभी लाड यांनी म्हटले आहे.