संजय नाईक सर यांचे अकाली निधन मनाला चटका लावून जाणारी दुःखद घटना
भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी व्यक्त केली भावना
मालवण | कुणाल मांजरेकर : भारतीय जनता पार्टीचे सक्रिय पदाधिकारी, मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच तथा कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रा. संजय नाईक यांचे आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. संजय नाईक सर यांचे अकाली निधन मनाला चटका लावून जाणारी दुःखद घटना असल्याची भावना निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून व्यक्त केली आहे.
प्रा. संजय नाईक हे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते होते. पेंडूर गावचे सरपंच पद देखील त्यांनी भूषवले होते. कट्टा येथील वराडकर हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या प्रा. नाईक यांनी अलीकडे हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली होती. उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून अल्पावधीतच त्यांनी ओळख निर्माण केली होती. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीव असे काम केल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग परिसरात होता. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या अकाली निधनाबद्दल भाजपा नेते निलेश राणे यांनी शोक व्यक्त केला आहे. “वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, पेंडूर गावचे माजी सरपंच, मालवण तालुका माध्यमिक पतसंस्थेचे माजी चेअरमन, भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते, भंडारी समाजाचे पदाधिकारी तसेच जि. प. सिंधुदुर्गच्या माजी सभापती (महिला व बाल कल्याण समिती ) श्रावणी संजय नाईक यांचे पती संजय सुभाष नाईक यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तिव्र धक्याने दुःखद निधन झाले. अत्यंत दुर्दैवी व मनाला चटका लावून जाणारी ही दुःखद घटना आहे. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.