ठाकरे गटात खळबळ : उपनेते गौरीशंकर खोत नारायण राणेंच्या भेटीला !
वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आ. नितेश राणेंचे देखील केले अभिष्टचिंतन ; भाजपा प्रवेशाच्या चर्चा
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेते गौरीशंकर खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे गटाचे सचिव आणि तत्कालीन खासदार विनायक राऊत यांचा पराभव करून येणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या अधिश निवासस्थानी भेट घेतल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. आ. नितेश राणे यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गौरीशंकर खोत यांनी आ. राणे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरीशंकर खोत यांच्या “अधिश” भेटीमुळे ते भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांनी मातोश्रीचे विश्वासू शिलेदार असलेल्या विनायक राऊत यांचा दारुण पराभव करून मागील दहा वर्षे ठाकरेंकडे गेलेल्या कोकणच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे हा पराभव ठाकरेंच्या देखील जिव्हारी लागला आहे. त्यानंतर आज गौरीशंकर खोत यांनी मुंबई येथे खा. राणेंच्या बंगल्यावर जात त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सौ. नीलम राणे, आमदार नितेश राणे हेही उपस्थित होते. गौरीशंकर खोत यांनी राणेंची भेट घेत केलेल्या अभिनंदनामुळे गौरीशंकर खोत हे पुन्हा एकदा राणेंसोबत भाजपात पक्षप्रवेश करणार काय ? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उबाठा शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत हे पूर्वीच्या काळात नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार होते. मात्र मध्यंतरीच्या काळात गौरीशंकर खोत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहत राणेंच्या विरोधात राजकारण केले. मात्र आज खोत यांनी खा. राणेंसह राणे कुटुंबीयांच्या घेतलेल्या भेटीमुळे शिवसेना उबाठाच्या गोटात खळबळ उडाली आहे.