तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा मृतदेह आढळला ?
तब्बल ४०० कि मी अंतरावरील रेवदांडा किनारी आढळला मृतदेह ; कपड्यांवरून ओळख
मालवण | कुणाल मांजरेकर
तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तब्बल १३ दिवसांनी मृतदेह मिळून आला आहे. किशोर चोडणेकर हे ८ जुनच्या रात्री समुद्रात मासेमारीसाठी गेले असता होडी उलटून बेपत्ता झाले होते. तळाशील पासून तब्बल ४०० किमीवर असलेल्या रेवदांडा किनाऱ्यावर हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. त्याच्या अंगातील कपड्यावरून ओळख पटली असून चोडणेकर यांच्या नातेवाईकांना याठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय -५५) हे ८ जुन रोजी मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय – १४) वर्षे आणि खलाशी धोंडीराज परब (वय ५५ वर्षे, रा. तारकर्ली) यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सदर मच्छीमार सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास होडी उलटली. तीनही जण समुद्रात बुडाले. लावण्य हा पोहून बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी सापडला. मात्र किशोर यांचा अद्यापही शोध लागला नव्हता. स्थानिक ग्रामस्थ, शोध पथक, पोलीस तसेच प्रशासन यंत्रणा, कोस्ट गार्ड हॅलीकॉप्टर तसेच जिल्हा पोलीस प्रशासन टीमने ड्रोन द्वारे त्यांची शोध मोहीम घेतली.
दरम्यान, आज सकाळी रेवदांडा समुद्रकिनारी अज्ञात मृतदेह मिळून आला. या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या टी शर्टवर घाटकोपर भटवाडी साईदर्शन असा उल्लेख असल्याने हा फोटो घाटकोपर मध्ये व्हायरल झाला. त्यानंतर हा मृतदेह चोडणेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.