वायरी मोरेश्वरवाडीत मध्यरात्री अग्नीतांडव ; घर जळून तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान

घरातील टीव्ही, फ्रिज, कपाट, कपडे, भांडी, रोख रक्कम, दागिन्यासह अन्य चिजवस्तू जळून खाक

स्थानिकांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने विझवली आग ; पालिकेचा अग्निशमन बंब ठरला निरूपयोगी

घर जळीतग्रस्त प्रसाद तोडणकर तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर यांचा सख्खा मेव्हणा ; कुटुंबावर दुहेरी संकट

मालवण (कुणाल मांजरेकर) मालवण शहरातील वायरी मोरेश्वरवाडीत प्रसाद गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घराला आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तोडणकर यांच्या घरातील वस्तू, भांडी, कपडे, रोख रक्कम आणी सोन्याची चैन जळून खाक झाली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत सुमारे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

याबाबतची मिळालेल्या माहितीनुसार, वायरी भूतनाथ मोरेश्वरवाडी येथे विक्रम तोडणकर यांचे राहते घर आहे. तोडणकर यांचा मासेमारीचा व्यवसाय असल्याने ते रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घरास कुलूप लावून व्यवसायासाठी सहकाऱ्यांकडे गेले. तर तळाशील येथील होडी दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या किशोर चोडणेकर यांच्या घराकडे घरातील नातेवाईक गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. यात रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घरास अचानक आग लागली. आगीचा लोळ पसरल्याचे दिसताच माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि सहकारी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीच्या भडक्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण बनले. यात संपूर्ण घर जळून खाक झाले.

या आगीत एलईडी टीव्ही, लाकडी कपाट, फॅन, शेगडी, रोख २३ हजार ७०० रुपये, इतर कागदपत्रे व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तर मातृत्व आधार फाउंडेशनच्या संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.प्रसाद तोडणकर हे मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. आगीत तोडणकर यांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या दुर्घटनेमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या माध्यमा तुन त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच शासनाच्या वतीने देखील जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्याची मागणी अशोक तोडणकर यांनी केली आहे. 

मोठी दुर्घटना टळली

विक्रम तोडणकर यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिज व अन्य वस्तू देखील या आगीत जळाल्या. मात्र सुदैवाने या ठिकाणी असलेल्या सिलेंडरने पेट न घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा नजिकच्या घरांना देखील धोका निर्माण झाला असता

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!