२३ लाख लुटीच्या बनावात ४ जण ; सर्वांच्या मुसक्या आवळल्या : रोकडही हस्तगत
वैभववाडी पोलिसांचे होतेय कौतुक ; २४ तासात आरोपी गजाआड
वैभववाडी : वैभववाडी येथील २३ लाख लुटीच्या बनावात एकूण ४ जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्वांच्या मुसक्या आवळण्यात वैभववाडी पोलिसांना यश आले आहे. या चोरीतील रक्कम देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींच्या वैभववाडी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सदर दोन्ही आरोपींना कुडाळ येथून ताब्यात घेतले आहे. चोरीतील २३ लाख रुपये रक्कम या दोन आरोपींकडे पोलिसांना सापडली आहे. लाडू उर्फ निखील सदाशिव वेंगुर्लेकर (वय ३०, रा. कोचरे वेंगुर्ला सध्या राहणार एमआयडीसी कुडाळ) व किरण प्रभाकर गावडे (वय ३२, रा. नेरूर वाघाचीवाडी कुडाळ) या आरोपींचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. एटीएम कंपनीचा कर्मचारी मुख्य आरोपी सगुण मनोहर केरवडेकर (वय ३३, रा. केरवडे कुडाळ) व विठ्ठल जानू खरात (वय ३०, रा. वायंगणी वेंगुर्ला) यांच्यासह निखिल वेंगुर्लेकर, किरण गावडे या चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
वैभववाडी येथील बँक ऑफ इंडिया च्या एटीएममध्ये २३ लाख भरण्यासाठी नेत असलेली रक्कम चोरीला गेलेली नसून आम्हीच तो बनाव रचल्याची कबुली या चौघांनी पोलिसांना दिली आहे. २४ तासात गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. उपनिरीक्षक प्रविण देसाई, पो. उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.