नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; नवऱ्याला बेड्या !
गोळवण मधील सौ. जयश्री खरात हिच्या आत्महत्येप्रकरणी नवरा बाळकृष्ण खरातवर गुन्हा दाखल
कुणाल मांजरेकर
मालवण : गोळवण मधील विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी तिचा नवरा बाळकृष्ण खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूलबाळ होत नसल्याने नवऱ्याकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ आणि नवऱ्याचे अन्य एका महिलेशी असलेले संबंध यांमुळे सौ. जयश्री खरात हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील पोलिसांना मिळाली आहे. नवरा बाळकृष्ण याला रात्रीच अटक करण्यात आली आहे.
गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला होता. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, जयश्री हिच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एक चिठ्ठी पोलिसांना तपासादरम्यान सापडून आली. यात मुलबाळ होत नसल्याने पती शारीरिक व मानसिक छळ करतो त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालवण पोलीसांचा तपास सुरू होता. बुधवारी मयत जयश्री हिची बहीण सौ. संतोषी संतोष वरक (रा. कडावल कुडाळ) यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जयश्री हिचा पती बाळकृष्ण हा जयश्री हिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. मुलबाळ होत नसल्याने परत लग्न करण्यासाठी एका महिलेशी संबंध असल्याचेही बाळकृष्ण याने जयश्री हिला सांगितले होते. एकूणच जयश्री हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार बाळकृष्ण बमु खरात (वय- ५३) याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात ४९८ (अ), व आत्महत्येस प्रवृत्त केल्यापकरणी ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.