नारायण राणेंच्या विजयात किनारपट्टीचा मोठा हातभार ; तब्बल १०,७३६ चे मताधिक्य

भाजपचे मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांची माहिती ; किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यास होणार मदत

मालवण | कुणाल मांजरेकर

लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी खा. विनायक राऊन यांच्यावर ४८००० मतांनी विजय मिळविला. नारायण राणे यांच्या या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे, अशी माहिती भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किमीच्या किनारपट्टीवर देवगड नगर पंचायत व मालवण, वेंगुर्ला अश्या दोन नगरपालिका असून ३५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ३८ गावामध्ये नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०६ मतदान केंद्रे (बूथ) असून यापैकी ९४ मतदान केंद्रावर राणे आघाडीवर आहेत. एकंदर मतदानापैकी नारायण राणे यांना २९,२७५ तर पराभूत उमेदवार विनायक राऊत यांना १८५३९ मते पडली. म्हणजेच महायुतीचे उमेदवार खा. नारायण राणे यांना सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात तब्बल १०७३६ एवढे मताधिक्य मिळाले. नारायण राणे यांच्या रूपाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार  तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेल तर्फे आपण आभार मानतो. किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नारायण राणे यांच्या रूपाने अनुभवी आणि सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच मत्स्यव्यवसाय, पर्यटन  व इतर पूरक व्यवसायासाठी  केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आशा रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!