किरण सामंत यांची निवडणूक काळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंशी भेट ; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत : निलेश राणेंचा सूचक इशारा

मंत्री उदय सामंत पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातून राणेसाहेबाना लीड देण्यात कमी पडले

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदार संघ म्हणून भाजपचा केला दावा

वैभव नाईक कोणत्या पक्षातून विधानसभा लढवणार हे अद्याप अस्पष्ट ; कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी जनताच त्यांचा पराभव करणार

कुणाल मांजरेकर

भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निकालातील काही खटकणाऱ्या बाबींवरून शिवसेना शिंदे गटाचे रत्नागिरीतील स्थानिक नेते मंत्री उदय सामंत आणी त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे बीएमसी मधील एक आर्किटेक्ट पाटील यांच्या मध्यस्थीने उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटल्याचा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी करत याचे पुरावे मी देऊ शकतो, असे म्हटले आहे. आम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे नेते आहेत, बॉस आहेत. पण त्यांनाही पक्षात कोणत्या गोष्टी होतायत, ते कळले पाहिजे, आम्ही त्यांच्या निदर्शनास हे आणून देणार, असे निलेश राणे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निलेश राणे यांनी आज ही पत्रकार परिषद घेऊन किरण सामंत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. किरण सामंत हे व्यावसायिक आहे. पक्षामध्ये त्यांचे स्थान काय आहे, ते कोणत्या पदावर आहेत, हे मला माहित नाही. त्यामुळे व्यावसायिकांवर मी काय बोलावे ? मंत्री उदय सामंत यांनी भाऊ म्हणून त्यांच्या लोकसभा उमेदवारीची मागणी केली असली त्याला काही तरी बेस लागतो. माझा त्याच्याशी काही आक्षेप नाही. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यावर समन्वय का राखला गेला नाही, याचा अभ्यास त्यांनी करावा. एकीकडे 40 वर्षे राजकारणात असलेला एक माजी मुख्यमंत्री, ज्याला पक्षाने उमेदवारी दिली आहे, त्यानंतर असे विषय होत असले तर बरोबर नाही. आम्ही विजय मिळवून दाखवला पण काही गोष्टी विसरणार नाही. आणि राणेना माफ करायची सवय नाही. ज्या गोष्टी पक्षाकडे सांगायच्या आहेत, त्या आम्ही सांगणार, असे निलेश राणे म्हणाले.

निवडणुकीत किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेना भेटले. बीएमसी चा आर्किटेक्ट पाटील नामक व्यक्तीने ही मिटिंग घडवून आणली. किरण सामंत उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या काळात का भेटले हे मला माहीत नाही. आर्किटेक्ट पाटील आणि त्यांचे काय संबंध आहेत हे मला माहित नाहीत. पण हे सगळं व्हायला नको होते. शिंदे साहेबांना आम्ही या सर्व गोष्टी सांगणार आहोत. मी याचे पुरावे देणार आहे, असे ते म्हणाले.

उदय सामंत लीड का देऊ शकले नाहीत, ते स्वतः सांगतील

उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यांचे आणी आमचे संबंध चांगले आहेत. पण पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी लोकसभेला केली नाही. ते पालकमंत्री असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात आम्ही मायनस आहोत. सिंधुदुर्गच्या तिन्ही विधानसभा मतदार संघात आम्ही लीडमध्ये आहोत. रत्नागिरी मधून उदय सामंत का लीड देऊ शकले नाहीत, या बाबत ते स्वतः बोलतील. साहेबांच्या मिरवणुकीला ते का येऊ शकले नाहीत ते स्वतः सांगतील, असे निलेश राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!