कोकणात पुन्हा एकदा “राणेसरकार” ; नारायण राणेंचा ४७,९१८ मतांनी विजय !

खा.विनायक राऊत यांचे विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे स्वप्न भंगले ; भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण 

मालवण ! कुणाल मांजरेकर 

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार, ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा त्यांनी ४७ हजार ९१८ मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा खासदारकी जिंकून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे विनायक राऊत यांचे स्वप्न भंगले आहे. या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्या मध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे मागील दोन टर्म विनायक राऊत हे प्रतिनिधित्व करीत आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र तत्कालीन खासदार निलेश राणे यांचा पराभव करत येथून विजय मिळवला होता. तर 2019 मध्ये देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश राणे यांचा खा. राऊत यांनी पराभव करीत सलग दुसऱ्या वेळेला विजय संपादन केला होता. यावेळी सलग तिसऱ्यांदा विजयाचे स्वप्न घेऊन ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या विनायक राऊत यांचा विजयी रथ रोखण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ऐनवेळी निवडणूक लढवण्याचे आदेश दिले. प्रचाराला मिळालेल्या अल्पशा कालावधीत नारायण राणे यांनी जोरदार व्युहरचना करून अखेर विनायक राऊत यांचा पराभव करून 2014 मध्ये निलेश राणे यांच्या पराभवाचा वचपा काढला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!