देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथसह मालवणातील वीज पुरवठा सुरळीत करा
अशोक सावंत यांनी वेधले महावितरण अधिकाऱ्यांचे लक्ष ; कुंभारमाठ, घुमडे येथील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याबाबतही चर्चा
तारकर्ली, देवबाग मधील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर बैठकीसाठी प्रयत्न : बाबा मोंडकर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यात विजेच्या तक्रारी वाढत असून जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या तारकर्ली गावासह देवबाग, वायरी भूतनाथ गावात पर्यटन व्यवसायावर गदा आली आहे. ह्या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांनी मंगळवारी महावितरणच्या देऊळवाडा येथील कार्यालयात धडक देऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. मेहेत्रे व कनिष्ठ अभियंता तारापुरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी घुमडे, कुंभारमाठ मधील कमी दाबाच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी याठिकाणी विजेचा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मालवण शहराचा वीज पुरवठा देखील सुरळीत करण्यात यावा, यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही श्री. सावंत यांनी दिली. तर तारकर्ली, देवबाग मधील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर बैठकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.
मालवण मधील विजेच्या तक्रारी संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महावितरण कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर, घुमडे सरपंच स्नेहल बिरमोळे, माजी सरपंच विष्णू बिरमोळे, शशांक कुमठेकर, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ गावात कमी दाबामुळे पर्यटनाचे नुकसान होत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. याठिकाणी क्षमतेपेक्षा विजेचा वापर वाढल्यामुळे येथे वारंवार वीज पुरवठा बंद होत असून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र स्थानिकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकारी वर्गाने समन्वय साधून काम करावे, मात्र कारवाईचा फार्स करू नये, असे बाबा मोंडकर यांनी सांगितले. तर शासनाकडून जी मदत लागेल, ती उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्याची ग्वाही अशोक सावंत यांनी दिली.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण करा : अशोक सावंत
पावसाळा तोंडावर आला असून पावसाळा सुरु होण्यापूर्वी खराब वीज पोल बदलणे, झाडी तोडणे, विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करणे अशी कामे महावितरणने करून घ्यावीत, पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला महावितरण जबाबदार राहील असा इशारा अशोक सावंत यांनी दिला. देवबाग साठी स्वतंत्र लाईन जोडलेली असून याचा ट्रान्सफॉर्मर जळल्याने ही लाईन बंद आहे. ही लाईन सुरु केल्यास याठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत होईल, असे अशोक सावंत यांनी सांगितले.
घुमडे गावात कमी दाबामुळे वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर असून तो तातडीने बसवण्यात यावा, असे अशोक सावंत म्हणाले. तर कुंभारमाठ मध्ये देखील असाच त्रास होत असून कमी दाबामुळे येथे पाणी पुरवठा होत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. स्वयंभुवाडी येथे 63 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर असून हा ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवून 100 केव्ही करावा अशी मागणी करण्यात आली.