ऐन पर्यटन हंगामात मालवणचं प्रसिद्ध रॉकगार्डन काळोखात ; तिकीट काउंटरही बंद !

महेश कांदळगावकर यांची नाराजी ; प्रशासकीय राजवटीत “आंधळं दळतंय, कुत्र पीठ खातंय” अशी मालवण नगरपालिकेची अवस्था 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात मागील आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच चाकरमानी दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स याला पर्यटकांची पसंती आहेच पण त्याचबरोबर मालवण शहरात समुद्रकिनारी असलेल्या रॉक गार्डनला देखील असंख्य पर्यटक भेट देत आहेत. तसेच मालवण शहरातील नागरिक, चाकरमानी यांची पण रॉकगार्डनला पसंती मिळत आहे. असे असताना मालवणच्या पर्यटन वैभवात भर घालणारे प्रसिद्ध रॉक गार्डन काळोखात असल्याचा प्रकार रविवारी दिसून आल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मांडली आहे. आमच्या कालावधीत लोकप्रतिनिधीनी रॉकगार्डनची प्रसिद्धी वाढवण्याचे काम केले. मात्र पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत  “आंधळं दळतंय, कुत्र पीठ खातंय” अशी मालवण नगरपालिकेची अवस्था झाल्याची टीका त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या पत्रकात महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, आमच्या कालवधीमध्ये कोकण पट्ट्यात नाही असा एकमेव म्युझिकल फाउंटन या रॉकगार्डन मध्ये बसविण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळणी,  बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची पसंती आहेच पण त्याचबरोबर स्थानिकाची पण पसंती आहे. पण याच्या देखभाल दुरुस्तीकडे बघायला सध्या प्रशासकाकडे वेळ नाही.  सध्या प्रचंड गर्दी असताना रविवार सारख्या दिवशी याठिकाणी लाईट बंद, म्युझिकल फाउंटन बंद अशी परिस्थिती आहे. गार्डन बघायला येणाऱ्या व्यक्ती कडून पाच रुपये प्रवेश फी घेतली जाते. ज्यापासून नगर परिषदेला लाखो रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे असा तिकीट काउंटर पण रविवार सारख्या दिवशी बंद ठेवला जातो.

बोटिंग मागील दोन अडीज वर्षे बंद आहे. टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत असल्याने याठिकाणी आमच्या कालवधीत सुमारे २५ लाख खर्च करुन घेण्यात आलेल्या पाच गाडयापैकी एक गाडी आणून ठेवण्याबाबत दोन वर्षापासून सुचित करूनही कुठलीही कार्यवाही नाही. हे सगळं म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती झालेली आहे. लोकप्रतिनिधीनी सूचना करूनही शहर विकासाच्या कुठल्याही बाबतीत प्रशासकाची अनास्था आहे. त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हेच अधोरिखित होत आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या क्षमतेप्रमाणे आपल्या शहराचा विकास होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण ज्याना कोणाला शहराच्या विकासाचे काही देणे घेणे नसते असा एखादा अधिकारी विकासकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन जर शहराची वाट लावत असेल तर त्याच्यावर लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीत कोण अंकुश ठेवणार हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे महेश कांदळगांवकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!