Kokan Railway : एप्रिलमध्ये फुकट्या प्रवाशांकडून २ कोटी ६९ लाखांचा दंड वसूल
कोकण रेल्वेकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ; १५,१२९ जणांकडून दंड वसूल
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे कडून सातत्याने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. फुकट्या प्रवाशांमुळे कोकण रेल्वेच्या अधिकृत प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल २०२४ मध्ये केलेल्या तपासणीत कोकण रेल्वेत एकूण १५,१२९ अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले असून त्यांच्याकडून २ कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे. येणाऱ्या काळातही कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहिम सुरू राहणार आहे. अभिमानाने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा, तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.