आडवली भटवाडी मध्ये उबाठाला धक्का ; ग्रा. पं. सदस्यासह ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश
प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची उपस्थिती ; वाडीतून ८० % मतदान द्या, विकासाची जबाबदारी आमची : दत्ता सामंत यांचा ग्रामस्थांना शब्द
२०१४ नंतर गावात विकासाच्या सुविधा का आल्या नाहीत, त्याचा ग्रामस्थांनी विचार करून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन
गावातील अपूर्ण जलजीवन योजनेच्या कामावरून ठाकरे गटाकडे असलेल्या आडवली मालडी ग्रा. पं. चा कारभार उघड
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांचे कुडाळ, मालवण मतदार संघात उबाठा गटाला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या आडवली गावातील भटवाडी येथे गुरुवारी रात्री ग्रा. पं. सदस्य स्वप्नील लाड यांच्यासह येथील शेकडो ग्रामस्थांनी गावातील प्रलंबीत विकास कामे मार्गी लावण्यासाठी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे किमान अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होणार आहेत. या वाडीतून किमान ८० % मते द्या, तुमची विकासाची कामे राणे साहेब आणि पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून निश्चित मार्गी लावली जातील, असा शब्द दत्ता सामंत यांनी दिला. २०१४ मध्ये गावातील रस्ते, पाण्याचे प्रश्न राणे साहेबांनीच मार्गी लावले होते. गेली १० वर्षे गावात ठाकरे गटाची सत्ता आहे, प्रत्येक निवडणुकीत येथील मतदार ठाकरे गटाच्या पाठीशी उभे राहतात. मग दहा वर्षात गावातील मूलभूत सुविधांची पूर्तता का झाली नाही ? याचा विचार करून या निवडणुकीत पुन्हा एकदा राणेसाहेबाना भरघोस मतदान करा, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.
यावेळी स्थानिक भाजपा नेते बाळू कुबल, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, शक्ती केंद्र प्रमुख निलेश बाईत, उद्योजक विनायक बाईत, प्रशांत परब, राजेश तांबे, जॉन नरोन्हा, भार्गव लाड, भाजपचे बूथ प्रमुख जगदीश घाडी, ग्रा. पं. सदस्य स्वप्नील लाड, भगवान लाड, रोहिदास सावंत, कृष्णा लाड, दिलीप मालंडकर, विजय परब, प्रदीप मालंडकर, योगेश लाड, सीमा राऊळ यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलजीवनच्या अपूर्ण कामावरून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा भांडाफोड
गावातील जलजीवन योजनेचे काम भाजपामुळे अपूर्ण राहिल्याची ओरड गावात करण्यात आली होती. याबाबत चर्चा करण्यात आली असता दत्ता सामंत यांनी जल जीवनच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून अपूर्ण काम तात्काळ पूर्ण न झाल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावर अधिकाऱ्यानी ग्रामपंचायतीने दाखवलेल्या कामानुसार संपूर्ण काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे गावातील अपूर्ण काम ठाकरे गटाकडे असलेल्या ग्रामपंचायती मुळेच प्रलंबित राहिल्याचे स्पष्ट झाले. अखेर अधिकाऱ्यांनी गावात येऊन उर्वरित कामाची पाहणी करून हे काम पूर्ण करून देण्याची सूचना दत्ता सामंत यांनी केली. जल जीवन योजना केंद्रातील मोदी सरकारने आणली आहे. मात्र ही योजना राबवण्याकडे ग्रा.पं. चे दुर्लक्ष का ? असा सवाल दत्ता सामंत यांनी करून केवळ भाजपाच्या नावाने लोकांना भडकावून मते घेण्याचे काम आमदार, खासदारांनी केल्याचे ते म्हणाले. येत्या निवडणुकीत ग्रामस्थांनी राणे साहेबांच्या निशाणीवर8 निशाणीवर मतदान करावे, येथील रस्ते, पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू, असा शब्द दत्ता सामंत यांनी दिला.