मशाल रॅलीने मालवणात भगवा उत्साह…

खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजन ; खा. राऊत यांच्यासह आ. वैभव नाईक यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी

प्रचारात इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग पाहता विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार : खा. विनायक राऊत

मालवण शहरातून खा. राऊत यांना किमान अडीच हजाराचे मताधिक्य : शहरप्रमुख बाबी जोगी यांचा विश्वास

मालवण : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेना ठाकरे गट आणि इंडिया आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरुवारी रात्री मालवण शहरातून मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत ठाकरे शिवसेनेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह इंडिया आघाडी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीच्या निमित्ताने मालवण शहरात भगवा उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून मालवण शहरातून खा. राऊत यांना किमान अडीच हजाराचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणूक अनुषंगाने खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मालवण शहरात मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… खास. विनायक राऊत यांचा विजय असो… अशा घोषणा देत खासदार विनायक राऊत व आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत येथील ठाकरे शिवसेना शाखा येथून या मशाल रॅलीला सुरुवात झाली. शाखेकडून भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार येथे या रॅलीची समाप्ती झाली. रॅली दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या रॅलीत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरोसकर, युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, राष्ट्रीय काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस, नितीन वाळके, महेश जावकर, मंदार केणी, भाई कासवकर, सेजल परब, दीपा शिंदे, आकांक्षा शिरपूटे, पूनम चव्हाण, निनाक्षी शिंदे, तृप्ती मयेकर, नरेश हुले, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, भगवान लुडबे, रणजित परब, प्रवीण रेवंडकर, समीर लब्दे यांसह मालवण तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भगवा झेंडा अखंडपणे फडकवण्याचे काम येथील देवदेवतांच्या आशीर्वादाने कोकणातील जनतेने केले आहे. या निवडणुकीत आम्हाला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, आम आदमी पक्ष यांचं सक्रिय सहकार्य आम्हाला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर कमळ निशाणीवर उभ्या असलेल्या समोरील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणारच असा विश्वास खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!