उबाठाचा गड ढासळला : माणगावात दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने भाजपा प्रवेश
मागील दहा वर्षात आमदार, खासदारांकडून कोणतीही विकासकामे नसल्याने उबाठाचे मतदार नाराज ; शाश्वत विकासासाठी भाजपात प्रवेशाचा निर्णय
माणगाव भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडीमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून ८० % मतदान देणार
अपेक्षित मताधिक्य द्या ; केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार : दत्ता सामंत यांची ग्वाही
माणगांव | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड म्हणून अलीकडच्या दहा वर्षात ओळख बनलेल्या माणगांव खोऱ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी भगदाड पाडले आहे. या विभागातून मिळणाऱ्या मतदानाच्या जोरावर वैभव नाईक, विनायक राऊत यांनी आजपर्यंत विजय मिळवले. मात्र हा भाग विकासापासून कोसो दूर ठेवला, असा आरोप करत उबाठाचे मतदार आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री उबाठाला जय महाराष्ट्र करीत दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माणगाव भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा धडाका पार पडला. यावेळी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांनी उबाठा मधून भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावातून किमान ८० % मतदान देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या गावातील विकासाचे प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावले जातील, फक्त तुम्ही अपेक्षित मताधिक्य द्या, असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचा मानाची शाल, श्रीफळ देऊन हृदय सत्कार केला.
कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्याचा परिसर हा उबाठा चा गड म्हणून ओळखला जातो. मात्र भाजपा नेते दत्ता सामंत यांनी या गडाला मोठ्या प्रमाणात धक्का दिला आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत याठिकाणाच्या आंबेरी, नेरूर, नानेली आणि माणगांव मध्ये जम्बो पक्ष प्रवेश सोहळा पार पडला होता. त्या पाठोपाठ बुधवारी पुन्हा एकदा माणगांव मध्ये शेकडोंच्या संख्येने उबाठाच्या कार्यकर्ते आणि मतदारांचे पक्ष प्रवेश घेण्यात आले. यामध्ये माणगाव भटवाडी, पेडणेकरवाडी, ख्रिश्चनवाडी, सुतारवाडी ह्या वाड्यांचा समावेश आहे. या गावातून आजापर्यंत भाजपाला केवळ 10 ते 15 टक्के मतदान भाजपाला मिळत होते. मात्र ह्या ठिकाणी झालेल्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे गावातील किमान ८० % मतदान भाजपाला देण्याची ग्वाही येथील ग्रामस्थांनी दिली आहे.
यावेळी भाजपाचे कुडाळचे माजी तालूकाध्यक्ष विनायक राणे यांच्यासह मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, संतोष कोदे, राजू बिडये, मनोज हडकर यांच्यासह माणगांवचे माजी सरपंच सचिन धुरी, आंबेरी येथील ग्रा. पं. सदस्य सदगुरु घावनळकर, विश्राम सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून १९९० पासून मी काम करत आहे. राणेसाहेब जिल्ह्यात आल्यानंतर येथील रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न सुटले. २०१४ नंतर विनायक राऊत आणि वैभव नाईक हे टाळंबा, हत्तीच्या प्रश्नाचा राजकीय बाऊ करून निवडून आले. मात्र राणे साहेबांच्या काळात झालेल्या रस्त्यांचे देखील त्यांनी नूतनीकरण केले नाही. मात्र या निवडणुकीत तुम्ही साथ द्या, आम्ही आगामी काळात येथील रस्ते, पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, वाडोस मधील मोरे गावाला देखील त्यांनी भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. येथील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली.