राणेसाहेबांच्या विजयात युवा मोर्चाचाही सिंहाचा वाटा असावा, यासाठी तयारीला लागा !

कट्टा येथील युवा मोर्चाच्या बैठकीत माजी खा. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; पेंडूर, सुकळवाड, वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघाच्या वतीने आयोजन

युवा मोर्चाच्या संघटनात्मक नियोजनाचे दत्ता सामंत यांनी केले कौतुक ; जनतेच्या वैयक्तिक अडी अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

आपल्या युवा अवस्थेत आपण संघटनेचे काम करत असताना जोषपूर्वक व आक्रमक शैलीने काम करत होतो. तसेच संघटनेसाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या युवकांची फळी तयार करण्याचे आवाहन भाजपचे कुडाळ मालवण प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी कट्टा येथे बोलताना केले. हे व्यासपीठ तुमचेच आहे, हे लक्षात घेऊन संघटनेसाठी काम करा. भविष्यातील संधी आपलीच आहे आपल्यातीलच युवक उद्या हा पक्ष आणि देश पुढे नेतील असा विश्वास व्यक्त करून आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायणराव राणेसाहेब बहुमताने विजयी होणारच आहेत, त्यात आपला युवा मोर्चाच्या वाटा सिंहाचा असावा यासाठी तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले.

मालवण तालुका भाजपा युवा मोर्चा पेंडूर, सुकळवाड, वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघाच्या वतीने कट्टा येथे बूथ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा नेते दत्ता सामंत, मामा माडये, संतोष साटविलकर, राजन माणगावकर, शेखर फोंडेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर,‌ राकेश सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, दया देसाई, स्वप्नील गावडे, जगदीश चव्हाण, चेतन मुसळे, सुमित सावंत, सुशील गावडे तसेच सर्व बूथ अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने गावागावात बूथ तिथे युथ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी बूथ रचना सक्षम होणे गरजेजे आहे  त्यादृष्टीने गेले काही दिवस भाजपा युवा मोर्चा मालवण तालुका अध्यक्ष मंदार लुडबे यांच्या माध्यमातून गावागावात भेटी घेत संघटनात्मक बांधणी सुरू होती. त्यांचे एकत्रीकरण करून त्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा नेते दत्ता सामंत यांनी युवा मोर्चा मालवण पदाधिकारी यांचे सर्वप्रथम कौतुक केले. एवढ्या कमी वेळात जास्तीत जास्त बूथ रचना तयार करून हा संवाद त्यांनी घडवून आणला यासाठी युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करावे लागेल. युवा पिढीने आपली ताकद ओळखली पाहिजे. जे तुम्ही मनापासून ठरवाल ते तुम्ही साध्य नक्कीच कराल एवढी ताकद आपल्या युवा पिढीत आहे. आगामी काळात सत्ता आपलीच असणार त्यासाठी आतापासूनच तुम्ही तयारीला लागा. लोकांचे प्रश्न जाणून घ्या, त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणींना मदत करा. लोक तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास यावेळी त्यांनी उपस्थित युवा वर्गास दिला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!