रत्नागिरी – सिंधुदुर्गात महायुतीच्या उमेदवाराला मालवण तालुक्यातून ८० % मतदान मिळवून देणार
शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती ; शिवसेनेच्या वतीने मालवण शहर व जि. प. विभागनिहाय १२३ बुथवर बैठका
मालवण | कुणाल मांजरेकर
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेला सक्षम व कार्यसम्राट खासदार देण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मालवण तालुक्यातुन ८० टक्के मतदान देण्याचा निर्धार मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण शहर आणि जि. प. विभागातील १२३ बूथना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केल्याची माहिती तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निमित्ताने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचाच उमेदवार असावा अशी आशा बाळगून शिवसेनेच्या वतीने मालवण तालुक्यातील सर्व गावांत संबंधित बुथ प्रमुखांना भेटून योग्य ते मार्गदर्शन केले. मालवण तालुक्यातील एकूण सहा जिल्हा परिषद मतदार संघ तसेच मालवण शहर पैकी एकूण १२३ बूथ वरती बैठका घेऊन संबंधित बूथ प्रमुख व शिवदूत यांना लोकसभा निवडणुकी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून महायुती देईल त्या उमेदवाराला मालवण तालुक्यातून ८० टक्के मतदान मिळवून देणार असा निर्धार मालवण शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, तालुकाप्रमुख अरुण तोडणकर, उप तालुकाप्रमुख उदय गावडे, सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभाग प्रमुख, सर्व शाखाप्रमुख, सर्व बूथ प्रमुख, सर्व शिवदूत तसेच देवबाग सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच व सदस्य तसेच चाफेखोल सरपंच श्रीमती रवीना घाडिगावकर, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी त्यांच्या गावातील प्रत्येक बुथ वरील बैठकांमध्ये केलेले आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील एकूण २६९ बूथ वरती जास्तीत जास्त मताधिक्य देऊन महायुतीच्या संभाव्य उमेदवाराला निवडून आणू तसेच बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाला एक सक्षम कार्यसम्राट असा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहु असे विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांनी म्हटले आहे
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार हा शिवसेनेचा असावा आणि त्यात करून किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनाच उमेदवारी मिळावी, अशी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ईच्छा आहे. परंतु शेवटी पक्षादेश महत्त्वाचा त्यामुळे पक्ष आणि महायुती देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करून त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असेही तालुकाप्रमुख राजा गावकर म्हणाले.
एकदा प्रचार यंत्रणा चालू झाली की पुन्हा एकदा गावोगावी आणि प्रत्येक बूथ वरील वाडीवस्त्यांवरती फिरून प्रत्येक घरापर्यंत महायुतीच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामांची यादी पोचवुन सरकारने केलेल्या प्रत्येक शासन निर्णयाची माहिती सर्व मतदारांना देऊन प्रचार यंत्रणा राबवली जाईल, असे तालुकाप्रमुख महेश राणे यांनी म्हटले आहे.