मालवणात भव्यदिव्य स्वरूपात निघणार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा ; स्वागत यात्रेचे २१ वे वर्ष 

बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल-ताशा पथक आकर्षण : चित्ररथ, विविध वेशभूषा साकारत महाराष्ट्रीय संस्कृतीचे होणार दर्शन

मालवण : मालवण शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी भव्यदिव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघणार आहे. यावर्षी स्वागत यात्रेचे हे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्यदिव्य स्वरूपात मंगळवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भरड दत्त मंदिर येथून स्वागत यात्रा निघणार आहे. मार्गावर सर्वत्र स्वागत यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत होणार आहे. 

मालवणवासियांच्या एकत्रित सहभागातून व सहकार्यातून निघणारी ही स्वागत यात्रा दरवर्षी भव्यदिव्यता वाढत जाणारी अशीच ठरते. याही वर्षी ही स्वागत यात्रा अधिक भव्यदिव्य असणार आहे. त्या दृष्टीने सर्वांच्या सहभागातून नियोजन सूरू आहे, अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समन्वयक भाऊ सामंत यांनी दिली.

यावर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्त निघणाऱ्या भव्यदिव्य शोभयात्रेत मोठमोठे ढोल, पारंपरिक वेशभुषेतील कलावंत यांच्या सहभागातील बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल-ताशा पथक विशेष आकर्षण असणार आहे. सोबत स्थानिक कलाकार यांच्या सहभागातून ऐतिहासिक चित्ररथ, सोबत घोडे, चार गटातील विविध वेशभूषा स्पर्धक यांसह महाराष्ट्रीय संस्कृतिचे दर्शन विविध ग्रुपच्या माध्यमातून केले जाणार आहे. एकूणच भगव्या उत्साहातील भव्यदिव्यता हिंदू नववर्ष स्वागत यात्रा माध्यमातून याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे.

सायंकाळी ५ वाजता भरड दत्त मंदिर येथून स्वागत यात्रेची सुरवात होणार आहे. बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ मार्गे मामा वरेरकर नाट्यगृह परिसर येथे रात्री स्वागत यात्रेची सांगता होणार आहे. मालवण वासिय हिंदू प्रेमी यांचा एकत्रित स्वरूपातील उत्स्फूर्त सहभाग हेच या स्वागत यात्रेचे आपलेपण असल्याचे भाऊ सामंत यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!