मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा
मालवण : शहरातील मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य भाविकांनी चौकचार पाषाणाचे दर्शन घेतले. यानिमित्त रात्री पारंपारिक घुमट वादन व सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले.
चौकचार मांड उत्सवानिमित्त चौकचार घुमटी येथे सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांनी उपस्थिती दर्शवत पूजा अर्चा करत नवस बोलले व फेडले. सायंकाळी वाडेकरी मंडळींकडून सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले. रात्री पारंपारिक घुमट वादन तसेच कलावंतीण नृत्य सादर झाले. यासाठी तबला – वैभव मांजरेकर व हार्मोनियम – प्रफुल्ल मांजरेकर यांची संगीतसाथ लाभली. तर सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी हनुमंत वायंगणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित गीते सादर केली. त्यानंतर मनोज (लारा) मयेकर यांच्या ओंकारा ग्रुपच्या कलाकारांचे विविध रेकॉर्ड डान्स तसेच स्थानिक बाल कलाकारांचे रेकॉर्ड डान्स सादर झाले. तर विकी जाधव यांच्या ग्रुपचे मालवणी बाहुबली हे विनोदी नाटक सादर झाले. या उत्सवनिमित्त दि. ३ एप्रिल रोजी रात्री ९ वा. वाडवळ भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उत्सवास चौकचार मित्रमंडळाचे अध्यक्ष यशवंत मेतर, बाळू तारी, आपा मोरजकर, लक्ष्मण प्रभू, राजा गावकर, संतोष पराडकर, विनायक मोरजकर, अभय कदम, राजू वाघ, विनायक मेतर, यतीन मेतर, भूषण मेतर, नितेश पेडणेकर, अजित शेलटकर, बाळा आढाव, पचा आढाव, राजू आढाव, दीपक आढाव, काका तारी आदी व इतर उपस्थित होते.