रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाचाच उमेदवार हवा ; भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांची अपेक्षा
युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधील उमेदवारा ची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघातील भाजपाची मजबूत संघटनात्मक बांधणी, मोदी सरकारच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात झालेली कोट्यावधीची विकास कामे, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही जिल्ह्यांचा झालेला विकास विचारात घेऊन या मतदार संघात भाजपा चाच उमेदवार असावा, अशी तमाम युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत श्री. ताम्हणकर यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा इतिहास जर पहिला तर २०१४ व २०१९ सालीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपा युतीचे उमेदवार विनायक राऊत हे येथून निवडून आले. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता जनता पक्ष कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने येथून विजय मिळवू शकतो, असा विश्वास आम्हा युवा मोर्चाला आहे. मागील अडीज वर्ष सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा विकास हा प्रगतशील मार्गाने होत आहे. या ठिकाणी मोदी सरकारच्या योजनांचे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावोगावी मोदी सरकारला पूर्ण पाठींबा दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहेत. राज्यात जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह
पुन्हा सतेत आली, तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम हाती घेत बऱ्यापैकी पूर्णत्वास आणले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रस्ते देखील योग्य दर्जाचे झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं स्वप्न असलेला सिंधुदुर्ग विमानतळ आता एक उंच भरारी घेत आहे. याठिकाणच्या विमान फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पर्यटन, मत्स्य, शेती सारख्या विविध क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या निधीतून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे १८५ कोटीच्या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले. त्याचप्रमाणे मुंबई गोवा महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी १२ कोटींचा निधी राणेसाहेबांनी आणला आहे.
मालवण शहरातील तारकर्ली सारख्या दुर्गम भागात नेव्ही डे साजरा करण्यात आला. त्यातून येथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण देखील पार पडले. तर माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे हे पारंपरिक मच्छिमार व्यावसायिक, टॉलर व्यावसायिक तसेच पर्यटन व्यावसायिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले नेतृत्व आहे. निलेश राणेंच्या माध्यमातून दांडी येथे बंधारा कम जेट्टी जे काम आधीच्या सरकारने झुलवत ठेवले होते, ती मागणी पूर्णत्वास आणून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. तर अंगणवाडी नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे. कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा आमदार नितेश राणे आपल्या कामामुळे आपल्या मतदार संघात नेहमीच जनसामान्य नागरिकांच्या मनातले ताईत झाले आहेत. हा विचार करून या मतदार संघातून भाजपाचाच उमेदवार उभा करावा, अशी मागणी श्री. ताम्हणकर यांनी केली आहे.