सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच ; निलेश राणे यांचे प्रतिपादन

जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयाचे निलेश राणे यांच्या हस्ते नूतन वास्तूत स्थलांतर 

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले. राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा बँकेने मागील २२ ते २३ महिन्यात उत्तुंग कामगिरी केली आहे. याचे श्रेय जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना जात असल्याचे सांगून ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मालवण बाजारपेठ येथील बाणावलीकर हेरिटेज येथील नूतन इमारतीत जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. या नूतन कार्यालय आणी एटीएम मशीनचे उदघाटन भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, संचालक बाबा परब, मेघनाद धुरी, भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, विजय केनवडेकर, डॉ. सुभाष दिघे, भगवान लुडबे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, आज मालवण शहरात सुस्सज शाखा सुरु झाली आहे. बँक चालवणे सोपे नाही. ज्याला अर्थकारण समजलं तोच चांगली बँक चालवू शकतो. मनीष दळवी यांना हे अतिशय चांगल्या प्रकारे समजलं आहे. त्यांचा कारभार मी जवळून बघितला आहे. देशपातळीवर जिल्हा बँक नेण्याचे सर्वाधिक श्रेय मनीष दळवी यांना जाते. बँकेत सुसज्जपणा, पारदर्शकपणा असला पाहिजे. शहरात व्यापारी, शेतकऱ्यांना काय हवं आहे, त्याचा विचार करून बँकेने कारभार करणे आवश्यक आहे. आणी तो अभ्यास जिल्हा बँकेने अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची वाटचाल सुरु आहे. समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत बँक पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्याच्या सूचना राणे साहेबांनी आम्हाला दिल्या आहेत. मागील २२ ते २३ महिने आम्ही काम करत आहोत. आजपर्यंतच्या बँकेच्या ३८ पेक्षा जास्त वर्षाच्या वाटचालीत २१०० कोटींच्या ठेवी जमा झाल्या होत्या. पण आमच्या कालावधीत ९०० कोटी पेक्षा जास्त ठेवी प्राप्त झाल्या आहेत. ठेवी वाढण्यासाठी ग्राहकांचा बँकेच्या नेतृत्वावर, संचालकांवर विश्वास असला पाहिजे. आजपर्यंत ठेवीदार आपल्या ठेवी राष्ट्रीय बँका, खासगी बँका, पतसंस्था यांच्याकडे ठेवत होते. पण आम्ही त्याबाबत जनजागृती केली. त्यामुळे ठेवी वाढल्या आहेत. या मार्च अखेरीला आम्ही ३००० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे यांनी केले. यावेळी संचालक बाबा परब यांनी विचार मांडले. यावेळी बँकेच्या वतीने जागा मालक डॉ. बाणावालीकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ठेवीदारांना पावत्या सुपूर्द करण्यात आल्या. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!