महिला मॅरेथॉनमध्ये सहभागी ग्लोबल रक्त विरांगनांची १७ मार्चला होणार मोफत तपासणी
उदया (रविवारी) सकाळी ७ वाजता देऊळवाडा टे कोळंब पूल सागरी महामार्गावे महिला मॅरेथॉन
मालवण : ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “रन फॉर हेल्थ” हे ब्रीद वाक्य घेऊन रविवार दि. १० मार्च रोजी सकाळी ७.३० वा. पासून देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पूल दरम्यान महिलांसाठी मालवण तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या महिला मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या २५ वर्षांवरील महिलांची येत्या 17 मार्च रोजी मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
मालवणात रविवारी होत असलेली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा आहे. “चला धावूया रक्तदान जनजागृती साठी.. चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी.. चला सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी” हा संदेश या निमित्ताने देण्यात येणार आहे. एकूण सहा गटात ही स्पर्धा होणार आहे. यात पहिला गट : १०ते १५ वयोगट (२ कि.मी), दुसरा गट : १६ ते २५ वयोगट (२ कि.मी), तिसरा गट : २६ ते ३५ वयोगट (२ कि.मी), चौथा गट : ३६ ते ४५ (२ कि.मी), पाचवा गट: ४६ ते ५५ चालणे (मिनी वॉक) २ कि.मी, सहावा गट : ५६ वर्षा पुढील महिला चालणे (मिनी वॉक) २ कि.मी. असे ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच पहिला उत्तेजनार्थ आणि दुसरा उत्तेजनार्थ असे नंबर काढून या प्रथम पाच महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 25 वर्षांवरील महिलांची रविवारी 17 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत मोफत तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ शंकर सावंत (M.D. Dermatologist), मुंबई हे त्वचारोग आणि केस तज्ज्ञ तपासणी करणार आहेत. ग्लोबल मालवणी पॉलीक्लिनिक, सावित्री जेनेरीक मेडिकल स्टोअर्स नजीक, शॉप नं १४, नागेश्वरपार्क, अथर्व कॉम्प्लेक्सच्या समोर, कॉलेज रोड, बांगीवाडा, मालवण येथे ही तपासणी होणार आहे. यासाठी स्पर्धेत दिलेले कूपन घेऊन येणे आवश्यक आहे. तरी सर्व महिला ग्रुप, कॉलेज ग्रुप, सामाजिक संस्था, महिला बचत गट, सर्व महिला खेळाडू, सर्व माजी शालेय महिला ग्रुप यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ग्लोबल रक्तविरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.