बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून गृहोपयोगी भांड्यांच्या संचाची भेट ; जिल्ह्यातील ९ हजार कामगारांना मिळणार लाभ

मालवण तालुक्यातील १३५० बांधकाम कामगारांचा समावेश ; मामा वरेरकर नाट्यगुहात वितरण

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक स्तरावर वितरणाला सुरुवात ; कामगारांनी मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ९ हजार बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्याचा संच देण्यात येणार आहे. यामध्ये मालवण तालुक्यातील १३५० बांधकाम कामगारांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्हा मुख्यालयात हे वितरण करण्यात येत होते. मात्र त्यामध्ये बांधकाम कामगारांचा वेळ आणि पैसा अधिक प्रमाणात खर्च होत असल्याची बाब भारतीय मजदूर संघाचे प्रदेश संघटन मंत्री हरी चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे आता तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी हे वाटप होणार आहे. मालवण तालुक्याच्या वाटापाचा शुभारंभ शनिवारी मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आला. सोमवार आणि मंगळवारी देखील हे वाटप केले जाणार आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बांधकाम कामगारांना सेफ्टी किट देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही योजना रखडली होती. अलीकडे राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार सत्तेत येताच पुन्हा एकदा बांधकाम कामगारांना घरगुती भांड्याचा सेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी हे साहित्य जिल्हा मुख्यालयात वितरीत केले जात होते. मात्र त्याठिकाणी जाण्या येण्यासाठी कामगारांचा वेळ आणि पैसा वाया जात होता. ही बाब भारतीय मजदूर संघाचे प्रदेश संघटन मंत्री हरी चव्हाण यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबत येथील भाजपा पदाधिकारी यांनीही पालकमंत्र्यांसह माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे पाठपूरावा केला. नुकतेच पालकमंत्री आंगणेवाडी येथे आले असता त्यांचे याठिकाणी लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे बांधकाम कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी हे साहित्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मालवण तालुक्यातील १३५० नोंदीत कामगारांना मामा वरेरकर नाट्यगृहात हे साहित्य देण्यात येणार आहे. शनिवारी याचा शुभारंभ करण्यात आला. याठिकाणी साहित्य घेण्यासाठी कामगार कुटुंबियांनी मोठी गर्दी केली होती. सोमवार आणि मंगळवारी देखील हे वाटप सुरु राहणार आहे. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मालवणमध्ये सर्वाधिक नोंदीत कामगार नोंदणी

जिल्ह्यात नऊ हजार कामगारांना या वस्तूचा लाभ मिळणार आहे. यात मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामगारांची नोंदणी झाली आहे. येथील भाजपा पदाधिकारी आणि भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन ही नोंदणी केल्याचे सहायक कामगार आयुक्त आयरे यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!