“महाराष्ट्र बंद” चा फज्जा उडाल्यानंतर “बंद” यशस्वी करण्यासाठी शिवसेनेची विनवणी आणि अरेरावीही !

मालवण शहरातील प्रकार ; नगराध्यक्षांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर !

कुणाल मांजरेकर

मालवण : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंदचा मालवणात पुरता फज्जा उडाला. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. यावेळी आठवडा बाजारात आलेल्या परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. याबाबतचे व्हिडिओ समोर आले असून या प्रकारामुळे व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मालवण मध्ये या बंदचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार देखील नियमितपणे भरला होता. त्यामुळे दुपारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी आठवडा बाजरात जाऊन तेथे आलेल्या व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यावेळी स्वतः नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेचे व्हिडीओ समोर आले असून यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दिसून येत आहे. आधीच मालवणात बाजाराची फाळणी झाली आहे. त्यातून राजकीय बंदसाठी दादागिरी का ? असा सवाल या घटनेनंतर व्यापाऱ्यांमधून उपस्थित करण्यात आला आहे. खर तर बंद करण्याची विनवणी करणे आणि बंद करा सांगणे ह्यात फरक असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!