दहशतवादाचा कांगोरा पिटणाऱ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का ?
विजय केनवडेकर यांचा सवाल ; मालवण, कणकवलीतील दडपशाहीचा केला निषेध
शिवसेनेच्या “त्या” हुल्लडबाज कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा ; सुदेश आचरेकर यांची मागणी
कुणाल मांजरेकर
आमदार वैभव नाईक सातत्याने दहशतवादाचा कांगोरा पिटुन आरोप प्रत्यारोप करीत असतात. पण आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमदारांच्या समोरच कणकवली मध्ये व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. मालवण मध्येही सागरी महामार्गावर बसलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावत त्यांची भाजी आणि इतर साहित्य फेकून दिले. हा दहशतवाद नाही का ? असा सवाल भाजपचे उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी करून या प्रकाराचा भाजपा आणि भाजपा उद्योग व्यापार आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, लोकशाही मार्गाने बंद पाळला असता तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र आज मालवणात व्यापाऱ्यांची भाजी फेकून अरेरावी करण्याचा जो प्रकार झाला, तो निषेधार्थ आहे. या प्रकरणी पोलीसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली.
येथील भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, गटनेते गणेश कुशे, विजय चव्हाण, पंकज पेडणेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी श्री. केनवडेकर म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीने दुसर्या राज्यातील शेतकर्यांचा कळवळा घेत आज महाराष्ट्र बंद पुकारला. इथल्या शेतकर्यांना न्याय देण्यास त्यांना वेळ नाही. या बंदच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्यासमोरच व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. ज्यांनी दुकाने बंद केली नाही त्यांच्या दुकानाच्या शटरवर लाथा मारण्यात आल्या. शहरातील सागरी महामार्ग येथे आठवडा बाजारात आलेल्या भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवला नाही म्हणून त्यांची भाजी अन्य साहित्य फेकून देण्यात आले. गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात व्यापार्यांचे मोठे हाल झाले. त्यांची वीज बिले माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात चक्रवाढ व्याज लावून बिले वसूल करण्यात आली. त्यामुळे व्यापार्यांना बंद पाळण्यास सांगण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. तोक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्तांना अद्याप न मिळालेल्या भरपाईबाबत तसेच शहर विकास आराखड्याच्या प्रश्नासह शहरातील अन्य प्रश्नाबाबत त्यांनी आवाज उठविणे आवश्यक असताना महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे करताना दिसत नाहीत. मग आता ही बंदची नौटंकी कशासाठी? असा प्रश्नही श्री. केनवडेकर यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आमचा विरोध नाही. मात्र या बंदमध्ये जर हुकुमशाही, दडपशाही, दंडुकेशाही वापरली जात असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आठवडा बाजारात व्यवसायासाठी आलेल्या विक्रेत्यांचे साहित्य फेकून देणे हे योग्य नाही. ज्यांनी ही प्रकार केला आहे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आपली मागणी असल्याचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगितले