विनयभंगाच्या आरोपातून रेवंडीच्या आजी माजी सरपंचांसह १० जणांची निर्दोष मुक्तता
संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. सुमित जाधव, ॲड. समृद्धी आसोलकर यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
पायवाटेच्या वादातून गावातीलच महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून रेवंडी गावचे माजी सरपंच युवराज गणेश कांबळी, विद्यमान सरपंच अमोल अनिल वस्त यांच्यासह रेवंडी येथील दहा जणांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मे. महेश देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांमधील साक्षीच्या विसंगती, तपास कामातील त्रुटी यांमुळे न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. सुमित जाधव, ॲड. समृद्धी आसोलकर यांनी युक्तिवाद केला. ही घटना २५ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.४० वाजता घडली होती.
आरोपींमध्ये रवींद्र शिवा कांबळी, अजित यशवंत कांबळी, लक्ष्मण रामचंद्र रेवंडकर, प्रकाश विष्णू कांबळी, सचिन रमाकांत मोर्वेकर, जयराम तुळशीदास कांबळी, भावेश दिगंबर कांबळी, जगदीश जनार्दन कांबळी यांचा समावेश होता. या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
याबाबत दाखल फिर्यादीनुसार, सदरील महिलेने जागेची साफसफाई करण्यासाठी जेसीबी आणला होता. वरील ठिकाणी हे आरोपी आले आणि त्यांनी जेसीबी चालकाला वाटेत खड्डा मार नाहीतर तुझा जेसीबी फोडून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे जेसीबी चालकाने तेथे खड्डा मारला. याबाबत सदरील महिला याचा जाब विचारण्यासाठी येऊन ती जागेचे मोबाईल वरून चित्रीकरण करत असताना आरोपीनी आपल्याला अश्लील शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची तक्रार या महिलेने केली होती. यावरून वरील दहा जणांवर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४ अ (१)(४), १४३, १४७, १४९, ४२७, ५०६(१) प्रमाणे गुन्हा दाखल् केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांमधील विसंगती आणि तपासकामातील त्रुटींमुळे सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.