मनसेला मालवणात धक्का ! प्रीतम गावडे यांचा तालुकाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

नव्या राजकीय इनिंगचा आजच करणार श्रीगणेशा

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मालवण तालुक्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांनी तालुकाध्यक्ष पदाबरोबरच मनसेच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. प्रीतम गावडे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या राजीनाम्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रीतम गावडे हे आज संध्याकाळीच आपल्या नवीन राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा करणार असल्याचे समजते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अलीकडे सिंधुदुर्गात मोठी गळती लागली आहे. जिल्हा मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या समर्थकांनी राजीनामे दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाने उपरकरांवर कारवाई केली. यानंतर मनसे मधील राजीनाम्याचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते. मनसेने अलीकडेच केलेल्या नवीन नियुक्त्यांमध्ये चौकेतील युवा उद्योजक प्रीतम गावडे यांची मालवण तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र श्री गावडे यांनी कार्यकर्त्यांसह आपल्या तालुकाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!