आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने भाजपची ‘विकसित भारत विकसित महाराष्ट्र’ संकल्पना

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणार ; भाजप स्वागत कक्ष ठिकाणी विविध जनहिताच्या योजनासाठी होणार नोंदणी : भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती 

मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रे निमित्त भाजपाच्या माध्यमातून “विकसित भारत विकसित महाराष्ट्र” या संकल्पनेखाली शासनाच्या विविध सेवा अधिकाधिक भाविक जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपले सरकार, खादी ग्रामाद्योग, एमएसएमई योजना, सिंधुदुर्ग बँकेच्या योजना या सर्वांची नोंदणी केली जाणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे. 

आंगणेवाडी यात्रोत्सवात गेली १७ वर्षे भाजपच्या माध्यमातून स्वागत कक्ष उभारणी करून अनेक उपक्रम राबविण्यात आले. अतुल काळसेकर यांच्या संकल्पनेतील मोफत चष्मा वाटम उपक्रमात २० हजार पेक्षा जास्त जनतेला लाभ देण्यात आला. यावर्षी सर्वसमावेशक जनेतेचे हित लक्षात घेऊन विविध उपक्रम भाजपा स्वागत कक्षाच्या ठिकाणी राबविले जाणार आहे. याबाबतची माहिती अतुल काळसेकर यांनी स्वागत कक्षाच्या ठिकाणी दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई,  मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, बंड्या सावंत, महेश मांजरेकर, पप्या तवटे, आप्पा लुडबे, रविकिरण तोरसकर, महेश सारंग, महेश बागवे, विजय निकम, सोमनाथ पानवलकर, यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपच्या स्वागत कक्षाच्या ठिकाणी आपले सरकार माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, शेतकरी सन्मान दुरुस्ती, उज्वला गॅस केवायसी, विश्वकर्मा योजना, पंतप्रधान सूर्य घर बिजली योजना, ई श्रम कार्ड, आधारकार्ड दुरुस्ती, नोंदणी तसेच केवायसी केली जाणार आहे. माजी नगरसेवक आप्पा लुडबे व सहकाऱ्यांकडे याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून पंतप्रधान व मुख्यमंत्री कर्ज योजना, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विविध योजना, याची माहिती तसेच लाभही देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही सर्व माहिती भाजपा महिला मोर्चा संध्या तेरसे व दीपलक्ष्मी पडते व तत्ज्ञ मंडळीकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर एमएसएमई, केंद्र सरकारच्या विविध योजना, उद्यमी रजिस्ट्रेशन, कॉयर बोर्ड यातील सर्व योजनांची माहिती विजय केनवडेकर व सहकारी यांच्या माध्यमातून होणार आहे. याठिकाणी मतदार नोंदणीही होणार असून त्याची जबाबदारी दादा साईल यांच्याकडे देण्यात आली आहे. यासह नमो अँप सरलं अँप नोंदणी, शक्ती वंदना, महिला कल्याण, मुद्रा लोण, याबाबतही भाजपा पदाधिकारी व महिला युवा मोर्चा कार्यरत असणार आहे. भाविक जनतेने या सर्व सेवांचा लाभ घ्यावा आपल्या सोबत आधार कार्ड, रेशनकार्ड, व अन्य कागदपत्रे सोबत ठेवल्यास नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले आहे.

भाजप नेतेमंडळी राहणार उपस्थित 

केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपा राष्ट्रीय नेते विनोद तावडे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, भाजपा नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे यासह अन्य पदाधिकारी आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत भराडी देवी तसेच भाजपा स्वागत कक्ष याठिकाणी उपस्थित असणार आहेत अशी माहिती अतुल काळसेकर यांनी दिली आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!