महाविकास आघाडीच्या “बंद” चा मालवणात फज्जा ; आठवडा बाजारही फुल्ल !
बंदचे आवाहन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज
कुणाल मांजरेकर
उत्तर प्रदेश मधील लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंदचा मालवणात पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात बाहेरील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात आल्याने आठवडा बाजार देखील फुल्ल झाला होता. त्यामुळे बंद पुकारणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
उत्तरप्रदेश मधील शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सकाळी ९ ते दुपारी १ वा.पर्यंत सिंधुदुर्ग बंद पाळावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले होते. मात्र आज या बंदचा मालवणात पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. सोमवारी भरणारा आठवडा बाजार देखील फुल्ल झाला होता. तर स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील आपापली दुकाने सुरू ठेवली होती. एसटी, रिक्षा सेवा देखील सुरू असल्याचे पाहायला मिळाले.