ठाकरे- राणेंमधील विमानतळाच्या श्रेयवादाच्या लढाईत सुरेश प्रभू दुर्लक्षित !

प्रभूंच्या चाहत्यांकडून व्हिडीओ व्हायरल ; प्रभूंच्या कालावधीतच “चिपी”ला चालना

कुणाल मांजरेकर

चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या श्रेयवादाच्या लढाईने हा कार्यक्रम ढवळून निघाला असला तरी या विमानतळासाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेले प्रयत्न दुर्लक्षित राहिल्याची खंत प्रभूंच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश प्रभू प्रेमींकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओ मधून चिपी विमानतळासाठी सुरेश प्रभू यांनी केलेल्या प्रयत्नांचा थोडक्यात आढावा घेण्यात आलाय.

चिपी विमानतळाचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आणि राजकिय चिखलफेक अवघ्या देशाने अनुभवली. राणेंनी आपल्या भाषणात चिपी विमानतळ आपल्याच मुळे साकार झाल्याचे सांगितले. तर उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकाळात चिपीला चालना मिळाल्याचे सांगितले.


मात्र ह्या सगळ्या धामधुमीत माजी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांचे चिपी विमानतळासाठीचे योगदान दुर्लक्षित राहिल्याची खंत प्रभूंच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणात सुरेश प्रभू यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. राजकिय पक्षाच्या पलीकडे ही लोकं असून चिपीच्या कार्यक्रमात प्रभूंचा विसर पडल्याची खंत या सर्वांना आहे. त्यामुळे चिपी मधील कालच्या “मानापमान” नाट्यानंतर प्रभू प्रेमींनी एक व्हिडिओ बनवून चिपीच्या मंजुरी साठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या योगदानाची थोडक्यात माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये खुद्द सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळ उभारणीसाठी आपण केलेल्या प्रयत्नांची माहिती दिलेला जुना व्हिडीओ संदर्भादाखल वापरण्यात आला आहे.

काय म्हटलंय सुरेश प्रभूंनी ?

चिपी विमानतळाचे काम रखडत रखडत सुरू होतं. सुरू होतं की नाही, हे पण सांगता येणार नाही. मी मंत्री झाल्यावर या विमानतळाला आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या. एक अतिशय महत्त्वाची परवानगी होती, ती कधीच मिळणार नव्हती. ती परवानगी मी मिळवून दिली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन विमानतळांसाठी सुमारे एक हजार रुपयांची गुंतवणूक कोकणात होतेय. त्याचा फायदा येणाऱ्या काळात कोकणाला नक्की होईल. मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील, असं सुरेश प्रभूंनी म्हटलं आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!