रामदास स्वामींच्या मठाला पर्यटनाचा वेगळा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार : खा. विनायक राऊत

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून मठाच्या बांधकामाचे भूमिपूजन

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींचा मठ किल्ले सिंधुदुर्ग समोर आहे.  आज या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन झाले त्याचबरोबर या मठाला येत्या काळात पर्यटनाच्या दृष्टीने वेगळा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

वायरी जाधववाडी येथील समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी सुमारे १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच नाना नाईक, दिलीप घारे, दीपा शिंदे, प्रियांका रेवंडकर, मनोज लुडबे, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, प्रदीप वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री. राऊत म्हणाले, वायरी जाधववाडीतील रामदास स्वामींचा पुरातन मठ आहे. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ओळखले जातात. याच छत्रपतींनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग समोर हा मठ आहे. या मठाच्या बांधकामासाठी आमदार नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे केवळ मठाचे काम न करता येथे येणाऱ्या पर्यटकांना या मठाची माहिती, दर्शन घेता यावे यादृष्टीने या मठाला पर्यटनाच्या माध्यमातून वेगळा दर्जा कसा मिळेल यासाठी येत्या काळात प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले.

पारंपरिक मच्छीमार व मच्छी विक्रेत्या महिला यांना मासेमारी बंदी कालावधीमध्ये त्यांना विशेष अनुदान दिले पाहिजे अशी तरतूद शासनाने कायमस्वरूपी पारंपरिक मच्छीमार व मच्छी विक्रेत्या महिलांना द्यावी सानुग्रह अनुदान द्यावे त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी संसदेमध्ये आणि राज्याकडेही केली आहे. याचबरोबर संपूर्ण किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी ५०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार नाईक म्हणाले, समर्थ रामदास स्वामींची सेवा करण्याची संधी या मंडळाने दिली हे माझे भाग्य आहे. किल्ले सिंधुदुर्गवरील मंदिराच्या नूतनीकरणाचे तसेच सिंहासनाचे उदघाटन नुकतेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या मठाच्या कामाचे आज भूमिपूजन झाल्यानंतर हे कामही लवकरात लवकर कसे मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या कामासह किनारपट्टी भागातील धूप प्रतिबंधक बंधार्‍यांची कामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रलंबित आहेत ही कामेही लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी आपले प्रयत्नसुरू आहेत मच्छीमार बांधवांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा राहिला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यास मी नेहमीच प्राधान्य दिले आहे त्यामुळे या पुढील काळातही मच्छीमारांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ महिलांचा खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!