मालवण बंदरजेटी येथे सोमवारी भव्य शिवजन्मोत्सव सोहळा ; शिवराजेश्वर मित्रमंडळाचे आयोजन
भव्यदिव्य शोभयात्रा, मालवणी सुपरहिट रोंबाट, वेशभूषा स्पर्धा यांसह विविध कार्यक्रम : रात्रौ ‘शिवबा’ नाटक होणार सादर
मालवण : शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती निमित्ताने शिव जन्मोत्सव २०२४ सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी १० वा. वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर ते मालवण बंदर जेटी शिवज्योत आगमन, सायंकाळी ४ वाजता दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शोभयात्रेला प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य सिंहासनी मूर्ती असणार आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध ढोलताशा पथक आराध्य च्या निनादाने आसमंत दुमदुमणार आहे. मालवणी सुपरहिट रोंबाट, वेशभूषा स्पर्धा, रथ यात्रा, मावळे, घोडे व हत्ती यांच्या सहभागातून आकर्षक शोभायात्रा भव्यदिव्य ठरणार आहे.
दोन गटात वेशभूषा स्पर्धा
लहान गट बालवाडी ते चौथी व मोठा गट पाचवी ते दहावी अश्या दोन गटात वेशभूषा स्पर्धा होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपात पारितोषिक व सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी नाव नोंदणी श्वेता जोशी 9404822437, तुषार मसुरकर 8766677379 यांच्याकडे करावी. शोभयात्रा नंतर सायंकाळी 7:30 वा. स्पर्धेचा पारितोषिक वितरण बंदर जेटी येथे होणार आहे.
महाराष्ट्रातील ११० कलावंत यांचा सहभाग असलेले सुप्रसिद्ध शिवबा हे नाटक रात्रौ ८ वाजता बंदर जेटी येथे उभारण्यात आलेल्या रंगमंचावर सादर होणार आहे. सुमारे पाच हजार जणांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. या नाटकाच्या सुरवातीला करण्यात येणारी फटाक्यांची आतषबाजी खास आकर्षण राहणार आहे. तरी शिवप्रेमींनी या शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.