माघी गणेश जयंती निमित्त मालवणात श्रींचे जल्लोषात आगमन
डीजेच्या तालावर निघालेल्या वायरीच्या राजाच्या मिरवणुकीत कोंबडा नृत्याचे आकर्षण
मालवण | कुणाल मांजरेकर
माघी गणेश जयंती निमित्त मालवणात आज सायंकाळी उशिरा श्रींचे वाजत गाजत उत्साहात आगमन झाले. शहरील माघी गणेश चौक आणि वायरी शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धीविनायक पटांगणावर विराजमान होणाऱ्या वायरीच्या राजाचे आज आगमन झाले. डीजेच्या तालावर निघालेल्या वायरीच्या राजाच्या मिरवणुकीत कोंबडा नृत्याचे आकर्षण ठरले.
मालवण शहरात सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ मालवण यांच्या वतीने माघी गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. यंदा उत्सवाचे ४६ वे वर्ष आहे. याठिकाणच्या माघी गणेशाचे सायंकाळी वाजत गाजत आगमन झाले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरानजिक कुंभारमाठ देवली येथील सिद्धीविनायक पटांगणावर रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंती साजरी केली जाते. याठिकाणच्या उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष आहे. याठिकाणच्या गणेशाचे डीजेच्या तालावर वाजत गाजत आगमन झाले. या मिरवणुकीत कोंबडा नृत्य लक्षावेधी ठरले. यावेळी संजय लुडबे, मंदार लुडबे यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.