गवंडीवाड्यात सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली “गाव चलो अभियान”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विकासात्मक कामांबाबत नागरिकांचे प्रबोधन
मालवण : भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. मालवण शहरातील गवंडीवाडा येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियान राबविण्यात आले.
या ठिकाणच्या स्थानिक जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली तसेच गवंडीवाडा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी दुपारच्या भोजनाचे देखील आनंद तेथील स्थानिक नागरिकांसमावेत सौरभ ताम्हणकर यांनी घेतला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशाने गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना करता प्रत्येक बुथवर एका प्रवासी कार्यकर्त्याची निवड करून सदर प्रवासी कार्यकर्ता हा त्या बूथवरील सर्व राजकीय, सामाजिक व विकासात्मक बाबींचा अभ्यास व निरीक्षण करून माहिती संकलन करण्याचे काम करत आहे. याबरोबरच समाजातील विविध घटकांची चर्चा करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मध्ये भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बुथवर किमान ५१ टक्के मतदान मिळावे याकरता नियोजन करत आहे. या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी समाजातील सर्वच घटकांनी या कार्यकर्त्याचे स्वागत करून मोदी सरकार करत असलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला. अनेक ठिकाणी महिला, युवा वर्गाकडून कार्यकर्त्यांचे स्वागत करून नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी बुध अध्यक्ष दादा कोचरेकर हे उपस्थित होते.