राणेंना डिवचणाऱ्या ठाकरेंना निलेश राणेंचा दणका ; तीन पं. स. सदस्य फोडले
कुडाळ पं. स. चे माजी सभापती राजन जाधव यांच्यासह शिवसेनेचे तीन सदस्य भाजपात
कुणाल मांजरेकर
चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राणेंना डिवचणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप नेते निलेश राणेंनी दणका दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला २४ तास उलटण्यापूर्वीच शिवसेनेचे तीन पंचायत समिती सदस्यांचा कणकवलीत निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजप मध्ये प्रवेश झाला आहे. यामध्ये माजी सभापती राजन लक्ष्मण जाधव, डॉ. सुबोध चंद्रकांत माधव आणि सौ. प्राजक्ता ललीतकुमार प्रभू यांचा समावेश आहे.
कुडाळ पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता होती. सध्या पंचायत समितीमध्ये दहा सदस्य शिवसेनेचे आहेत. येथे सभापती भाजपचा असून उपसभापती शिवसेनेचा आहे. दरम्यान शिवसेनेच्या माजी सभापती राजन जाधव, डॉ. सुबोध माधव व प्राजक्ता प्रभू या तीन सदस्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, कुडाळ सभापती सौ. नूतन आईर, जि. प. समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, आनंद शिरवलकर, विशाल परब, श्रीपाद तवटे, रूपेश कानडे, माजी सभापती मोहन सावंत, माजी नगरसेविका साक्षी सावंत, अश्विनी गावडे, रेखा काणेकर आदी उपस्थित होते.
शिवसेनेला आणखी धक्के देणार : निलेश राणे
शिवसेनेच्या तीन पंचायत समिती सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवसानंतर हा प्रवेश झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेमध्ये घुसमट होत असल्याच्या कारणांमुळे हे सदस्य आज आमच्याकडे आलेले आहेत. अजून काही झटके शिवसेनेला आम्ही देणार आहोत, अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी व्यक्त केली आहे.