मालवण नगरपालिकेमार्फत शहरात प्रभागनिहाय लसीकरणाला सुरुवात ; प्रभाग ८ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
९ ते १६ ऑक्टोबर पर्यंत होणार लसीकरण कार्यक्रम : नगराध्यक्षांची माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपालिकेमार्फ़त शहरात प्रभाग निहाय लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ९ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत हे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी ९ ऑक्टोबरला प्रभाग ८ मधून या लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तब्बल २६२ जणांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीत शहरात कोविड लसीकरण मोहीम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी नगराध्यक्षांच्या दालनात मुख्याधिकाऱ्यां समवेत झालेल्या बैठकीत शहरात ९ ते १६ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय लसीकरण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी दांडी येथे प्रभाग ८ मधून करण्यात आला. प्रभाग ८ मधील चिंदरकर कंपाउंड, शिवनेरी चौक, त्याचप्रमाणे दांडी शाळा आवारवाडी याठिकाणी कोरोना प्रतिबंधीत कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. यावेळी २६२ जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, स्थानिक नगरसेविका तृप्ती मयेकर, नगरसेविका सेजल परब, नगरसेवक पंकज सादये, तपस्वी मयेकर, राजू परब उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिका अधिकारी निलेश घाडगे, विणा चुरी, मिथुन शिगले, आरोग्य विभागातुन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, श्री. कोरडे, श्री. चांदोस्कर यांच्यासह आरोग्य सेविकांनी मेहनत घेतली. या लसीकरण मोहिमेबाबत प्रभागातील नागरिकांनी आभार मानले.
असा होणार लसीकरण कार्यक्रम
९ ऑक्टोबर प्रभाग ८, १० ऑक्टोबर प्रभाग ५ , ११ ऑक्टोबर प्रभाग ७ , १२ ऑक्टोबर प्रभाग ६ , १३ ऑक्टोबर प्रभाग ४ ,१४ ऑक्टोबर प्रभाग ३, १५ ऑक्टोबर प्रभाग २ ,१६ ऑक्टोबर प्रभाग १ याठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.