भरधाव डंपरने पादचाऱ्याला चिरडले ; पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

मालवण देऊळवाडा येथील घटना ; संतप्त नागरिकांकडून डंपर चालक, मालकाची हजेरी

अपघातग्रस्त डंपर विनानंबर प्लेट ; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा स्थानिकांचा आरोप

मालवण | कुणाल मांजरेकर

भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोईप येथील मुळ रहिवासी असलेले आणि सध्या देऊळवाडा येथील रहिवासी विजय वसंत नाईक (५३) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी उशीरा देऊळवाडा येथे घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत डंपर चालकाची चांगलीच हजेरी घेतली . याप्रकरणी पोलीसांनी डंपर चालक आणि डंपर मालक यांना ताब्यात घेतले आहे.

हडी येथील डंपर मालवण देऊळवाडा येथून हडी येथे जात होता. तर विजय नाईक हे आपले काम पूर्ण करून घरी जात होते. देऊळवाडा याठिकाणी डंपरची घडक नाईक यांना बसली आणि ते रस्त्यावर कोसळले, पोटाच्या भागाकडे डंपरचे चाक लागल्याच्या खुणा दिसून येत होत्या. तसेच डोकीलाही गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत होते. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत डंपर चालकाला थांबवून धरले होते. नाईक यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली असा परिवार आहे. कामानिमित्ताने ते मालवण देऊळवाडा याठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

मालवण तालुक्यात वारंवार भरघाव डंपरमुळे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्यावेळी होणारी डंपर वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी त्रासदायक होत आहे. मात्र या डंपर वाहतुकीवर कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने आज पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी करत त्याला चांगलाच चोप दिला. तसेच घटनास्थळी डंपर मालकही आल्यानंतरही त्यालाही चांगलेच नागरिकांनी सुनावले, पोलीस कर्मचारी यांनी डंपर मालक आणि चालक यांना आपल्या दुचाकीवर बसवून पोलीस ठाण्यात नेले होते.

अपघात घडल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती, मात्र रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नाईक यांना रिक्षेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने नागरिकांनी यावरही नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, घटनास्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात वाळू वाहतुक करणारे डंपरही मोठ्या प्रमाणात येत असल्याचे पाहून नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत डंपर वाहतूक बंद करण्याची मागणी केली. तसेच रस्त्यावरील डंपर वाहतूकही काही काळ रोखून धरली होती. भरधाव डंपरवर कारवाई होत नसल्याने अपघात होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. नाईक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते, अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!