रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघ जिंकण्यासाठी पंतप्रधानांचा मालवण दौरा : उद्धव ठाकरेंचा मालवणातून हल्लाबोल
पंतप्रधान इकडे आले, त्यांनी पुतळा बसवला. पण छत्रपतींच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरल्याची टीका
आमच्या रक्तात शिवाजी महाराज, आमच्या अंगात भगवा, तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणार नाही
गद्दारांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच ; लाल किल्ल्यावरही भगवा फडकवणार
मालवण | कुणाल मांजरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरामाराची स्थापना केली. त्यांची आठवण म्हणून पंतप्रधान इकडे आले, त्यांनी पुतळा बसवला. पण एवढं इकडे येऊनही मंदिरात जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायचं ते विसरल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवण बंदर जेटीवर आयोजित सभेत केली. जिल्ह्यात तो क्ते वादळ झालं, निसर्ग चक्रीवादळ आलं, इतर वादळे आली, तेव्हा पंतप्रधान इकडे आले नाहीत. अचानक त्यांना आठवण झाली की छत्रपती शिवाजी महाराज नावाची मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी आरामाराची स्थापना केली. रत्नागिरी – सिंधुदुर्गचा मतदार संघ जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काय तरी केलं तर मते मिळू शकतात, हे जाणूनच ते इकडे आले. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त लेचेपेचे नाही आहोत. आम्हाला तुमची सगळी ढोंग कळतात. आमच्या रक्तात शिवाजी महाराज आहेत. आमच्या अंगात भगवा आहे, तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री होण्याचं माझं स्वप्न नव्हतं. पण ज्या गद्दारांनी आमचं सरकार पाडलं, त्यांच्या नाकावर टिचून मी पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच. तसेच ज्या भगव्याला तुम्ही छेद केलात, त्या छत्रपतींच्या भगव्याची ताकद काय आहे, ते येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर भगवा फडकावून दाखवणारच असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
मालवण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवराजेश्वराचे दर्शन घेतले. तर आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून मंदिरात उभारलेल्या महाराजांच्या सिंहासनाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बंदरजेटी येथील आयोजित कॉनर सभेत त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. या भाजपचं राजकारण मी चुलीत घातल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. आम्ही कोणत्याही व्यक्तीचे अंघ मक्त नाही. जो जो हा देश आपला मानतो त्यात्ता मी आपला मानतो. देशात हुकुमशाही नको म्हणून आपण सर्व एकत्र आलो आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात सच्या हुकुमशाहीसारखे राज्य आहे. इंग्रजांनी जस राज्य केलं तसं सुरू आहे इंग्रजांसारखं फोडा आणि राज्य करा सुरू आहे. तरीदेखील क्रांतीच्या ठिणग्या पेटल्या व उठाव झाला. हा जो आमचा भगवा आहे, भाजपने त्याला छेद करण्याचा प्रयत्न केला. हे असे नतद्रष्ट राजकारणी महाराष्ट्राच्या मातीत गाडावेच लागतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला. शिवसैनिक हीच महाराजांनी मला दिलेली भवानी तलवार ही तलवार घेऊनच मी उभा आहे. त्यावेळी आग्र्या वरून आलेले आज दिल्ली वरून येतायत. मात्र महाराष्ट्राचे पाणी काय असतं ते त्याना लायकी नसली तरी दाखवायची गरज आहे.
ज्या गद्दारांनी चांगले चालणारे आपले सरकार पाडलं ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं . महाराष्ट्र गिळायला आणि महाराष्ट्र लुटायला मदत करण्यासाठी पाडलं. पंतप्रधान मालवणात आले. पण छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायला विसरले. मी आज भाषण करायला आलॊ नाहीय. मी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आलो. महाराजांना देणारा मी कोण ? त्यांनीच आम्हाला दिल आहे. महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का ? आपण राहिलो तरी असतो का ? ते राम मंदिर तरी असले का ? महाराजांकडून त्यांच्या शौर्याचा, अंशाचा, त्यांच्या तेजाचा एक कण जरी आपण घेऊ शकलो तर ह्या हुकूमशहाना आपण गाडू शकतो.
यावेळी खासदार विनायक राऊत, दत्ता दळवी, भास्कर जाधव, वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, रूची राऊत, गितेश राऊत, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, अरूण दुधवडकर, हरी खोबरेकर, भगवान लुडबे, मंदार ओरसकर, बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, पराग नार्वेकर, बाळा महाभोज, बाबा सावंत, उदय दुखंडे, सिया धुरी, विजय नेमळेकर, मंदार गावडे, किरण वाळके, उमेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर, सदा लुडबे, देवयानी मसुरकर, दिपा शिंदे, अमित भोगले, नाना नेरूरकर, प्रविण रेवंडकर, अक्षय रेवंडकर, चंदू खोबरेकर, सिद्धेश मांजरेकर, निनाक्षी शिंदे, शिल्पा खोत, रश्मी परूळेकर, पूजा तोंडवळकर, सुगंधा गावडे, अंजना सामंत, महेंद्र म्हाडगुत, प्रज्ञा चव्हाण, मंगेश चव्हाण, रिमा पाटकर, श्वेता सावंत, सेजल परब, सन्मेश परब, पूनम चव्हाण, माधुरी प्रभू, उर्वी लोणे, मिलींद नार्वेकर, तपस्वी मयेकर, रमेश कोरगावकर, संजय पडते, बाळा गावडे, सुरेश पाटील, उदय पाटेकर, भाई कासवकर, दर्शना कासवकर, भाऊ चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायनाक भंडारी यांचे स्मारक उभारणार
छत्रपतींच्या नौदल उभारणीमध्ये महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे असलेल्या मायनाक भंडारी यांचे उचीत स्मारक शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आल्यानंतर उभारण्यात येईल असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी बोलताना समस्त मालवणकरांना दिला. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात मायनाक भंडारी यांचे उचीत स्मारक नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये व्हावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती, मात्र त्याकडे कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. उत्तट पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निधी खर्च करण्यात आला. तसेच पंतप्रधानांनी एकही रूपया सिंधुदुर्गासाठी उपलब्ध करून दिलेला नाही, असे म्हटले होते. पाचाच धागा पकडून ठाकरे यांनी मायनाक भंडारी यांचे स्मारक आपण करणार असल्याचे जाहीर केले. महाराजाच्या बरोबरीने साधी सुधी माणसे उभी राहिली. १८ पगड जातीचे जमातीचे काटक मावळे उभे राहिले. त्यांच्या बरोबरीने, त्यांच्या विश्वासावर महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले. त्यांच्या सोबत्यांचे पूजन आपण केलं पाहिजे. असे ते म्हणाले.
वैभव नाईक यांचे कौतुक
वैभव याने सिंधुदुर्गातील गुडगिरी संपविली आहे आणि आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विनायक राऊत यांना विजयी करून दिल्लीवरही भगवा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यासपिठावर बसल्यानंतर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांना बोलावून आपल्या बाजूला बसवून आस्थेने त्यांची विचारपुस केली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांच्या डोळ्यात निष्ठावंत शिवसैनिकाबद्दल पक्षप्रमुखांकडे असलेली भावना दिसून आली.