तरुण, ज्येष्ठ, महिला व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळेच मालवणचा व्यापारी एकता मेळावा यशस्वी
उमेश नेरूरकर : मेळावा आयोजनात मोलाची साथ देणाऱ्या भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह उद्योजक दीपक परब, आशिष पेडणेकर यांचे मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा नुकताच मालवण मध्ये पार पडला. या मेळाव्याच्या आयोजनात युवा, ज्येष्ठ व्यापारी, महिला व्यापारी, आमचे असंख्य ग्राहक, हितचिंतक तसेच तालुक्यातील सर्व अध्यक्ष, व्यापाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हा मेळावा यशस्वी रित्या पार पडल्याची प्रतिक्रिया मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी व्यक्त केली आहे. या मेळाव्याच्या आयोजनात भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी “चला हवा येऊ द्या” च्या कलाकारांचा एक मोठा कार्यक्रम देऊन मेळाव्याला चांगल्या प्रकारे सुरुवात केली. तर उद्योजक डॉ. दीपक परब – मुळीक आणी आशिष पेडणेकर यांनी “अयोध्या” हा महानाट्याचे प्रायोजकत्व स्वीकारल्या बद्दल मालवण व्यापारी संघाच्या वतीने श्री. नेरूरकर यांनी त्यांच्यासह मेळाव्याला मदत करणाऱ्या अन्य मान्यवरांचे आभार मानले आहेत.
सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या ३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्ताने श्री. नेरूरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मालवण व्यापारी संघांच्या प्रत्येक घटकाने प्रामाणिक प्रयत्न केले. पहिल्या दिवशी निघालेली मोटारसायकल रॅली तर दृष्ट लागण्यासारखी होती. माजी खासदार निलेश राणे यांनी चला हवा येऊ द्या च्या कलाकारांचा मोठा कार्यक्रम देऊन मेळाव्याला चांगल्या प्रकारे सुरुवात केली. त्याबद्दल शहर व्यापारी संघातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच दुसऱ्या दिवशी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक परब मुळीक व आशिष पेडणेकर यांच्या सहकार्याने “अयोध्या” हे महानाट्य पार पडले. तिसऱ्या दिवशी व्यापारी मेळावा उत्तमरित्या पार पडण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या मेहनत घेतली. तसेच तालुक्यातील सर्व अध्यक्ष व व्यापाऱ्यांची साथ लाभली.
या सर्व मेळाव्यात व्यापाऱ्यांबरोबर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, परशुराम पाटकर, महेश उर्फ बाळू अंधारी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सिडनी रॉड्रिक्स यांनी निधी संकलन आणि मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी केली. भोजन विभागात देखील त्यांनी मदत कार्य केले. विजय केनावडेकर, गणेश प्रभुलकर यांनी तालुक्यात आयोजन करण्यात मोलाचे सहकार्य केले. व्यापारी मेळाव्याच्या कालावधीत माझ्या सर्व व्यापारी व महिला व्यापारी यांचे एक कुटुंब तयार झाले आहे. आगामी काळात हे सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात एकजुटीने काम करतील, असा विश्वास उमेश नेरूरकर यांनी व्यक्त केला आहे.