“आप नौजवान पार्टी की ताकद हो… आनेवाला समय आपकाही है…!”
राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेंनीथला यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक भिवंडी येथे संपन्न
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी इच्छुक उमेदवार म्हणून कामांची यादी केली सुपूर्द
मालवण | कुणाल मांजरेकर
कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक नुकतीच भिवंडी येथे घेण्यात आली. या बैठकीत कोकणातील लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आलेल्या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार यांची सध्याची तयारी, मतदार संघात केलेल्या पक्ष कार्याची व होणाऱ्या निवडणूकीसाठीची तयारी याचा आढावा घेत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघातील इच्छुक उमेदवार म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी देखील आपण केलेल्या संघटनेतील कामाची यादी राज्य प्रभारी रमेश चेंनीथला यांजवळ दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विलास गावडे, साक्षी वंजारी, रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनेष राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, ऍड. गांगण, सुरेश काटकर, सुगंधा साटम, मेघनाद धुरी, उल्हास मनचेकर, समीर वंजारी, विधाता सावंत, महेंद्र सांगेलकर, प्रदीप मांजरेकर, उमेश कुलकर्णी, भाबल व इतर पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी शंभर टक्के बूथ सक्षम करा. मतदारसंघ पिंजून काढा. कोकणातील जनता आजही आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास राज्य प्रभारी रमेश चेंनीथला यांनी व्यक्त करून यापूर्वी देखील युवक काँग्रेस मध्ये असताना मी कोकणात रायगड येथे येऊन गेलो होतो. येत्या काही दिवसात देखील मी कोकणात येणार आहे व तुमच्या सोबत गावोगावी फिरणार असे त्यांनी सांगितले. देशात काँग्रेस पक्षाला संधी आहे. आपल्या सोबत आघाडीत काही पक्ष आहेत. राज्यात देखील आपल्याला संधी आहे. तुम्ही प्रत्येकाने ध्येर्याने कामाला लागा. आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून लोकसभा मतदार संघातील बूथ सक्षम करा, जनता आपल्या सोबत आहे, विजय आपलाच आहे, असे त्यांनी सांगितले.