चिपी विमानतळाची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल ; केलं ट्विट
कुणाल मांजरेकर
कोकणच्या पर्यटनाला चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कार्यक्रमाची दखल घेतली आहे. याबाबतचं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या चिपी विमानतळाचे उदघाटन शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवित संबोधित केलं. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अजित पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अन्य मंत्री आणि लोकप्रतिनिधीनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करत या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. ना. सिंधिया यांचं हे ट्विट रिट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. “कोकण विभागातील लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. या विमानतळामुळे येथील कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.