मृत वीज कर्मचारी धनंजय फाले यांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची आर्थिक मदत

आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; आ. नाईक यांनी महादेवाचे केरवडे येथे भेट देत फाले कुटूंबीयांकडे अर्थसहाय्य मंजुरीचे पत्र केले सुपूर्द 

कुडाळ : वीजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडलेले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील धनंजय बाबू फाले यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून एक लाख  रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री सचिवालय व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. सदर रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून आ. वैभव नाईक यांनी महादेवाचे केरवडे येथे भेट देत धनंजयचे वडील बाबू फाले व कुटूंबीयांकडे अर्थसहाय्य मंजुरीचे पत्र सुपूर्द केले. याआधीही आ.वैभव नाईक यांनी स्वतः फाले कुटुंबियांना रोख स्वरूपात आर्थिक मदत केली होती.

धनंजय बाबू फाले हे महावितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणुन काम करीत होते. कुडाळ शहरातील विजेच्या खांबावर काम करीत असतांना महावितरण आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना वीजेचा धक्का लागून त्यांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी २१/०८/२०२३ रोजी मुख्यमंत्री सचिवालय व  सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार  प्रस्ताव मागवून घेत फाले कुटूंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि.प. सदस्य राजू कविटकर, श्रेया परब, मथुरा राऊळ,स्वप्नील शिंदे,निलेश सावंत आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!