निर्भय कसली ? ही तर ‘निर्लज्ज बनो”वाली चळवळ !

कणकवलीतील  ‘निर्भय बनो’ चळवळीच्या भूमिकेवर भाजपा प्रवक्ते अविनाश पराडकर यांची टीका

सिंधुदुर्ग : कोकणची भूमी ही साधुसंतांची भूमी आहे. इथल्या नागरिकांचे वर्तन शुद्ध आणि स्वच्छ असल्यामुळे त्यांच्यात बिलकुल डरपोकपणा नाही. त्यामुळे छुपा राजकीय अजेंडा घेऊन बाहेरून आलेल्या डाव्या विचारवंतांनी त्यांना निर्भय बनण्याचे धडे देण्याची काहीही गरज नाही. मात्र सिंधुदुर्गात येऊन इथल्या वारकऱ्यांवर गलिच्छ टिपणी करणाऱ्या निखिल वागळेसारख्या विक्षिप्त लोकांना जनतेने चपलेने मारून, तोंडाला काळे फासून इथून बाहेर हाकलले हा इतिहास आहे. असल्या देव, देश आणि धर्म यांच्या विरोधात घृणास्पद भूमिका घेणाऱ्यांनी कितीही निर्भय बघण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आपल्या वागणुकीत सुधारणा करून योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम, असा परखड सल्ला भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी दिला आहे.

निर्भय बनवण्याचा बोगस कारखाना कणकवलीत उघडणाऱ्या लोकांचा अजेंडा हा निव्वळ मोदीद्वेष व भाजपा विरोधाचा आहे. जोवर नरेंद्र मोदी केंद्रात आहेत तोपर्यंत आपली देशद्रोही धोरणे आणि छुप्या कारवाया इथे चालणार नाहीत, याची कल्पना असलेले लोक घटनेची पायमल्ली, ईडी- सीबीआयचा गैरवापर असल्या फसव्या बोंबा मारत आहेत. ज्यांना मुळातच कर नाही त्यांना डरण्याची गरजच काय? 

सिंधुदुर्गात सोशल मीडियावर विषारी धार्मिक पोस्ट टाकून इथले  वातावरण बिघडवण्याचे काम करणारे, महिला विनयभंगाचे आरोप असणारे काहीजण एकत्र येऊन नेमके यापुढे जिल्ह्यात काय घडवण्यासाठी “निर्भय” बनायच्या गोष्टी करत आहेत, हे चळवळीच्या आयोजकांनी स्पष्ट करावे. जे खरे निर्भय असतात, त्यांना ताकाला जाताना भांडे लपवावे लागत नाही. एकीकडे देशातल्या लोकशाही प्रणाली, न्याययंत्रणा यावर अविश्वास निर्माण करणारी कृती व वक्तव्ये करत लोकांमध्ये न्यायव्यवस्था विरोधी वातावरण करायचे, आणि वर लोकशाही धोक्यात असल्याची बोंब मारायची असली खोटी वृत्ती असलेले काही ढोंगी बहुरूपी असले निर्भयतेचे मुखवटे चढवत गावोगाव फिरत आहेत. त्यातच, जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागण्याची नाटके करणारे काही उध्वस्त अन बरखास्त पक्षप्रमुख अगतिकपणे आजकाल या लोकांची पालखी वाहू लागले आहेत. त्यांनी आपल्या पिढीजात संपत्तीचे खटले जनतेच्या न्यायालयात लढवण्यासाठीचा निर्भयपणा दाखवायची गरज होती. त्यांना सल्ला देणाऱ्या आणि विखारी वक्तव्यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनी आधी आपला खरा चेहरा उघड करण्याएवढे निर्भय होण्याची गरज आहे. पण ती हिंमत नसलेले डरपोक बाहेरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत इथल्या जनतेला निर्भय व्हायला शिकवत आहेत. हा सगळा डावा विचारवंतांचा मोदीद्वेषाचा शिमगा चालला आहे, पण असल्या थिल्लरपणाला कोकणी माणसे कसली शबय घालतात याची कल्पना निर्भय बनोवाल्या निखिल वागळेंना चांगलीच आहे. या चळवळीत राममंदिर सोहळ्यानंतर धार्मिक द्वेषाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत दंगली घडवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हा नोंद असलेले आरोपी सहभागी असल्याने इथले वातावरण बिघडू नये यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेने निर्भय बनत यांचे खरे कारनामे मोडून काढण्याची गरज आहे. यादृष्टीने पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले जाईल, असे अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!