आंगणेवाडीतील सुसज्ज सुलभ प्रसाधनगृहाचा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मालवण : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ उभारणी करण्यात आलेल्या सुलभ प्रसाधनगृह बांधकामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सहायक अभियंता अजित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.या पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख ८१ हजार ७४५ रुपये खर्च करत महिला व पुरुषांसाठी हे प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. प्रसाधनगृहाबरोबरच रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी पुरवठा व जलनिःसारण आदी कामेही मार्गी लावण्यात आली आहेत. या प्रसाधनगृहामध्ये १३ युरोपियन वॉटर क्लोसेट, १६ इंडियन वॉटर क्लोसेट, ८ स्नानगृह, २ लॉकर खोली, ४ अपंग शौचालय, ४ चेंजिंग खोली, १ हिरकणी कक्ष, १६ वॉशबेसिन, १४ युरिनल्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मे. सिद्धी असोसिएटस यांनी मुदतीपूर्वीच हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले आहे. यात्रेपूर्वी योग्य नियोजन करून हे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आंगणे कुटुंबीय यांनी केले आहे.