आ. वैभव नाईक यांच्या तक्रारीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनची उचलबांगडी

आ. नाईक यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती तक्रार ; प्रा. डॉ. मनोज जोशींकडे डीन पदाचा कार्यभार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठता (डीन) डॉ. सुनीता रामानंद यांच्या अनागोंदी कारभाराबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आवाज उठवत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने डीन डॉ. सुनीता रामानंद यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठतापदी प्रा. डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आ. वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरू करण्यात आले. आता विद्यार्थ्यांचे  तिसरे वर्ष सुरू आहे. परंतु मागील दोन वर्षात ओपीडी रुग्ण संख्या फार कमी झाली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले डीन व अकाउंट मॅनेजर नवले हे अत्यंत अनागोंदी कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या महाविद्यालयात औषध खरेदीसाठी लेखाशीर्ष केलेला नसल्याने डीपीडीसी मधून औषध खरेदीसाठी त्यांना पैसे देण्यात आले. त्यामुळे याठिकाणी औषधांची देखील वानवा आहे. या महाविद्यालयात वर्षभरापूर्वी २५  डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर काम करत होते.  मात्र आता त्यातील केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांचे पगार देखील तीन-तीन महिने दिले जात नाहीत. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची यंत्र सामग्री याठिकाणी उपलब्ध नाही. रक्तपेढी विभागात आवश्यक रक्त घटक नाहीत. शासकीय रुग्णालयामध्ये ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सिंधुदुर्गात दिल्या जात नाहीत. त्यामुळे सोयीसुविधा मिळत नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना गोवा येथे उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात राज्य शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!