शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची !
मालवणात ठाकरे गटाकडून निदर्शने ; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी
घटनाबाह्य अध्यक्षपद मिळवलेल्या नार्वेकरांकडून चुकीचा निकाल देऊन मोदी, शहांना रिटर्नगिफ्ट ; हरी खोबरेकरांचा हल्लाबोल
औरंगजेबाच्या काळापासूनच दिल्लीकडून महाराष्ट्राकडे आकसबुद्धीने पाहण्याची परंपरा ; दिल्लीवरून आलेल्या निकालपत्राचे नार्वेकरांकडून वाचन : नितीन वाळके
मालवण | कुणाल मांजरेकर
“मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल नार्वेकर मुर्दाबाद…, घटनेची पायमल्ली करणाऱ्या राहुल नार्वेकर यांचा निषेध असो…, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो…, शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची” अशी जोरदार घोषणाबाजी करीत ठाकरे गटाने गुरुवारी मालवणात निदर्शने केली.
दरम्यान, घटनाबाह्य विधानसभा अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी काल दिलेला निर्णय म्हणजे त्यांना जे अध्यक्षपद मिळाले त्याचे त्यांनी आताच्या सरकारला किंवा मोदी, शहा यांना खुश करण्यासाठी दिलेले रिटर्न गिफ्ट म्हणावे लागेल आणि हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दिसून आले आहे. घटनेचा, सर्वोच्च न्यायालयाचा आणि अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या विरोधात काल निकाल दिल्यानंतर गुरुवारी येथील ठाकरे गटाच्या कार्यालया बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी नितीन वाळके, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, दिपा शिंदे, रश्मी परुळेकर, निनाक्षी शिंदे, सन्मेश परब, यशवंत गावकर, विरेश नाईक, चिंतामणी मयेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश प्रभु, शिशुपाल राणे, राजू मेस्त्री, प्रसाद चव्हाण, चंदू खोबरेकर, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, तेजस लुडबे, अक्षय रेवंडकर, दत्ता पोईपकर, सचिन गिरकर, राहुल परब, बॉनी काळसेकर, मयूर करंगुटकर, यतिन खोत, काली परब, उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, अध्यक्षपदावर घटनाबाह्य अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर नार्वेकर यांनी काल जो निर्णय दिला तो त्यांना जे अध्यक्ष पद मिळाले त्याचे रिटर्न गिफ्ट म्हणावं लागेल. आज महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला दिले जात आहे. महाराष्ट्रातील सर्व रोजगार हा गुजरातला पळवला जातोय. तशाच पद्धतीने जे पक्ष पळवणारे गद्दार गट आहे आणि त्याला समर्थन देणाऱ्या गद्दार गटाला अभय देण्याचे काम कालच्या निकालाने राहुल नार्वेकर यांनी केलंय असा ठाम विश्वास सर्व जनतेच्या मनामध्ये आज प्रस्थापित झाला आहे. जर हे सरकार किंवा हे आमदार अपात्र ठरवले असते तर त्यांच्या अध्यक्षपदावर सुद्धा कदाचित गदा आली असती याची भीती राहुल नार्वेकर यांच्या मनात असल्यामुळे कालचा निर्णय त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध देण्याचे काम केले. जर पक्षप्रमुख अधिकृत नाही, सचिव अधिकृत नाही मग २०१९ ला ज्या पक्षप्रमुखाच्या ज्या सचिवांच्या स्वाक्षरीने दिलेले एबी फॉर्म निवडणूक आयोगाने कसे काय अधिकृत ठरवले हा जनतेला तसेच या देशाला पडलेला प्रश्न आहे. जी निवडणूक प्रक्रिया झाली होती. त्या ठिकाणी सचिवांनी दिलेले एबी फॉर्म अधिकृत कसे ते त्याचवेळी निवडणूक आयोगाने स्पष्ट करणे गरजेचे होते. त्यामुळे कालचा हा जो काही निकाल आहे हा निकाल जनतेला अपेक्षित नव्हता.
जनतेला आणि शत्रू देशाला जरी विचारले की शिवसेना कोणाची तर ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेनेची असेच उत्तर मिळेल. परंतु कालच्या निकालाने या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचे काम करण्यात आले आहे. या गोष्टीमुळे लोकशाही संपुष्टात येईल का आणि लोकशाहीची पायमल्ली करण्याचा काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्याचे दिसून येत आहे. कालच्या निकालामध्ये अध्यक्ष ज्या घटनेचा उल्लेख करत होते. त्यात पक्षांतर अंतर्गत कायदा कशा पद्धतीने लागू होतो ते नमूद करत होते. एखाद्याने पक्ष फोडला, पक्ष सोडला तर त्याला स्वतःचा पक्ष काढून त्या ठिकाणी आपला पक्ष स्थापन करायचा असतो. त्या घटनेचीसुद्धा पायमल्ली होताना दिसली. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाचे संविधान लिहिलं त्या घटनेची पायमल्ली करण्याचे कामही नार्वेकर यांनी केले हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. या गद्दार सरकारला कितीही अभय दिलं तरी जनतेच्या मनामध्ये राहुल नार्वेकर हे त्या गद्दारांना स्थान देऊ शकत नाहीत हे मात्र आज निश्चित आहे आणि या संपूर्ण घटनेचा आणि अध्यक्ष पदाचा गैरवापर केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत असे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
श्री. वाळके म्हणाले, इतिहास साक्ष आहे. महाराष्ट्राच्या फंदफितुरीला मागील दहा वर्षापासून पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याचा दिल्लीचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे. दिल्लीने सातत्याने मग तो औरंगजेबाचा काळ असो किंवा आताचा मोदी सरकारचा काळ. महाराष्ट्राकडे आकस बुद्धीनेच पाहिले आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी १०५ हुतात्म्यांचे बलिदान करावे लागले हा इतिहास आहे. मराठी माणसाची महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे आणि केंद्रशासित करण्याचं जे षडयंत्र दिल्लीमध्ये शिजत आहे. त्याचाच एक भाग काल दिल्लीवरून इंग्रजीतून आलेले निकालपत्र सभाध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखविले यावरून स्पष्ट होते. त्यांचे आभाराचे शेवटचे शब्द होते ते शब्द केवळ त्यांचे होते. बाकी सर्व निकालपत्र हे दिल्लीवरून आले होते. काल सकाळीच आमदार वैभव नाईक यांनी मुलाखतीत त्यांनी आधीच स्पष्ट केले की निकाल काय आहे हे आम्हाला समजला आहे. कारण मंत्रालयात चर्चा होती की तुमचे कोणतेही म्हणणे मान्य केले जाणार नाही. याचाच अर्थ की कायद्याचा आधार नाही आहे घटनेचा आदर नाही आहे. केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी म्हणून दिलेला हा निकाल आहे. इतिहासात जी नोंद खंडोजी खोपड्यांची झाली. अन्य फंद फितुरांची जी नोंद झाली. सूर्याजी पिसाळासारख्या तशीच नोंद ही महाराष्ट्राच्या भविष्यकालीन इतिहासात राहुल नार्वेकर यांची झाली आहे. यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने सजग राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची पिळवणूक करण्याचे, महाराष्ट्राची अस्मिता तोडून मोडून मातीमोल करण्याचे षडयंत्र हे भाजपप्रणीत तथाकथित मोदी सरकार या फंद फितुरांच्या सहायाने करत आहे. दुर्दैव असे आहे की फंद फितुरीचा महाराष्ट्राला लागलेला श्राप आजही संपलेला नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निकाला संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जे काय होईल ते होईलच पण जनतेचा मनात याचा निकाल कधीच लागलेला आहे. हिंमत असेल तर याच क्षणाला हे सरकार बरखास्त करून निवडणुका घेण्याचे धारिष्ट्य या तिघाडी सरकारने दाखवावे. तरच त्यांची कुठेतरी लाज, अब्रू, शरम जनाची नाही तर मनाची लाज राखली असे म्हणता येईल. पण हे धारिष्ट्य दाखविण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही आणि म्हणून श्रीखंडी सारखे वार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु संपूर्ण शिवसैनिकांच्या पाठबळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही सर्व शिवसैनिक महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातले शिवसैनिक ठामपणे उभे राहणार आहोत. आणि जेव्हा केव्हा निवडणूका होतील त्यावेळी महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे की या सगळ्याचा कायमचा निकाल लावण्याचा असेही त्यांनी स्पष्ट केले.